मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त अशोक सराफ आणि लेखक-अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी लवकरच ‘आदि अनंत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजोबा आणि नातवाच्या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या या कौटुंबिक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मोठ्या उत्साहात प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, या ट्रेलरचे अनावरण चित्रपटातील कलाकारांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.
कधी प्रदर्शित होणार?
आजोबा-नातवाच्या गोड नात्याची गोष्ट उलगडणाऱ्या ‘आदि अनंत’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट येत्या 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रेलरमध्ये आजोबा आणि नातवामधील गमतीजमती, हट्ट, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षणांची सुंदर झलक पाहायला मिळते. दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील विचारांचा फरक, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, आपल्या माणसांना सांभाळताना रोजच्या जीवनात करावी लागणारी धडपड आणि नात्यातील आपुलकी या गोष्टी दिग्दर्शकाने अत्यंत सहजपणे मांडल्या आहेत.
दिग्दर्शक काय म्हणाले?
याबद्दल दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा-नातवाचं नातं पडद्यावर मांडताना त्यातील सहजता आणि छोटे-छोटे प्रसंग मला महत्त्वाचे वाटले. या नात्यात कधी गंमत असते, कधी मतभेद असतात, तर कधी शब्दांत न मावणारी जवळीक असते. ‘आदि अनंत’मधून हे सगळे पैलू आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आपल्या घरातील माणसांची आठवण येईल. हा फक्त आजोबा-नातवाच्या नात्याचा नसून प्रत्येक नात्याचा चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा.”
दिग्गज कलाकारांची फळी
‘आदि अनंत’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच, चित्रपटाच्या टीझरसाठी अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी आपला आवाज दिला आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह हे सहनिर्माते आहेत.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची ही भावनिक आणि मनोरंजक गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.