ALIA BHATT - SHARVARI: YRF SHIFTS 'ALPHA' TO NEXT YEAR : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी यांचा आगामी 'Alpha' चित्रपट वारंवार लांबणीवर पडत असल्याचं चित्र दिसत आहे. यश राज फिल्म्सच्या (YRF) 'स्पाय युनिव्हर्स' (Spy Universe) चा एक भाग असलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख अखेर निश्चित झाली आहे. YRF ने अधिकृत घोषणा करत हा चित्रपट आता 17 एप्रिल 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल, असे सांगितले आहे.
पूर्वी हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांनी अभिनय केलेला 'वॉर 2' (War 2) बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही, त्यानंतर निर्माते आदित्य चोप्रा यांनी 'Alpha' च्या कामात लक्ष घातले. आता प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे व्हीएफएक्सचे (VFX) विस्तृत काम प्रलंबित असल्याचं कारण निर्मात्यांनी दिलं आहे. बॉबी देओलची देखील महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाचे मेकर्स प्रेक्षकांसमोर तो "व्हिज्युअली सर्वोत्तम स्वरूपात" सादर करू इच्छितात.
हेही वाचा - Paresh Rawal: “पुरस्कार हे फक्त प्रतिभेवर नाही, तर लॉबिंगवरही असतात अवलंबून”; अभिनेते परेश रावल यांचा धक्कादायक खुलासा
YRF च्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितले की, 'Alpha' हा आमच्यासाठी अत्यंत खास चित्रपट आहे. "आम्ही हा चित्रपट त्याच्या सर्वात सिनेमॅटिक स्वरूपात (most cinematic self) सादर करू इच्छितो." 'Alpha' चा थिएटरमधील अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. सूत्रांकडून एका वृत्तसंस्थेला असं सांगण्यात आलं आहे की, व्हीएफएक्स टीमवर वेळेचं मोठं दडपण होतं, त्यामुळे तारीख बदलण्याचा YRF चा निर्णय योग्य आहे.
'शिव रावेल' दिग्दर्शित 'Alpha' हा YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्रित (Female-Led) स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या स्पाय युनिव्हर्समध्ये शाहरुख खानचा 'पठाण', सलमान खानचा 'टायगर' आणि हृतिक रोशनचा 'कबीर' यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण बदलांमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Actor Dharmendra Hospitalised : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने ICU मध्ये उपचार सुरू