Thursday, November 13, 2025 02:44:46 PM

Paresh Rawal: “पुरस्कार हे फक्त प्रतिभेवर नाही, तर लॉबिंगवरही असतात अवलंबून”; अभिनेते परेश रावल यांचा धक्कादायक खुलासा

अभिनेता रावल म्हणाले की, अनेकदा निर्माते आणि दिग्दर्शक आपला चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात.

paresh rawal  “पुरस्कार हे फक्त प्रतिभेवर नाही तर लॉबिंगवरही असतात अवलंबून” अभिनेते परेश रावल यांचा धक्कादायक खुलासा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपट पुरस्कारांच्या विश्वातील लॉबिंगबाबत (lobbying) स्पष्ट भूमिका मांडली आहे. 1993 मध्ये “वो छोकरी” आणि “सर” या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार (National Award) जिंकलेल्या रावल यांनी सांगितले की, अगदी राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही काही प्रमाणात लॉबिंग असते आणि ही प्रथा फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर ती ऑस्कर पुरस्कारांपर्यंत पोहोचली आहे. राज शमानी यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत परेश रावल यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीतील अनुभवांबरोबरच पुरस्कारांच्या विश्वाविषयी मनमोकळं बोलताना सांगितलं की, “मला पुरस्कारांविषयी फारसं माहित नाही, पण एवढं मात्र सांगतो की, राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये थोडंफार लॉबिंग होतं. मात्र, इतर पुरस्कारांच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. बाकीच्या पुरस्कारांची तुलना राष्ट्रीय पुरस्कारांशी करता येत नाही, कारण राष्ट्रीय पुरस्कारांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वेगळीच आहे.”

परेश रावल यांनी पुढे सांगितले की, लॉबिंग ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर ती ऑस्कर पुरस्कारांमध्येही होते. “ऑस्करमध्येही मोठ्या प्रमाणावर नेटवर्किंग आणि ओळखी वापरल्या जातात. मोठ्या पार्ट्या करणे, गाठीभेटी घेणे आणि निवड सदस्यांवर प्रभाव टाकणे हे सर्व त्या प्रक्रियेचा भाग असतो,” असं त्यांनी सांगितलं. अभिनेता रावल म्हणाले की, अनेकदा निर्माते आणि दिग्दर्शक आपला चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. "सगळ्या अकॅडमी सदस्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होतो. हे सगळं त्या सिस्टीमचाच भाग आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप! 10 जणांचा मृत्यू, 150 जखमी

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, त्यांना आणखी कोणता पुरस्कार जिंकायचा आहे का, तेव्हा रावल म्हणाले, “माझ्यासाठी खरी ओळख म्हणजे दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकारांकडून मिळणारी प्रशंसा. त्यापलीकडे कोणताही पुरस्कार माझ्यासाठी विशेष नाही. जर माझं काम त्यांना आवडलं, तर तोच माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे.” परेश रावल यांना 1993 मध्ये “वो छोकरी” आणि “सर” या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

अभिनयाच्या क्षेत्रात आजही सक्रिय असलेले परेश रावल अलीकडे “द ताज स्टोरी” या चित्रपटात दिसले, ज्यात त्यांनी आग्रा येथील पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केले असून तो ताजमहालच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा सांगतो. याशिवाय परेश रावल “थम्मा” या भयपट कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या सोबत झळकले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सर्पोतदार यांनी केले असून निर्मिती दिग्दर्शक दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी केली आहे. पुढील काळात ते “हेरा फेरी 3”, “भूत बंगला” आणि “वेलकम टू द जंगल” या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा: PM Narendra Modi: ESTIC 2025 कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा; संशोधन आणि नवकल्पनांना मिळणार मोठा आर्थिक बूस्ट


सम्बन्धित सामग्री