मुंबई: बिग बॉस फेम प्रिया मलिकसाठी यंदाची दिवाळी अत्यंत वाईट ठरली आहे. ऐन दिवाळीत अभिनेत्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्री मलिकचा जीव थोडक्यात बचावला असला तरी तिची प्रकृती गंभीर आहे.
प्रिया मलिक आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतानाच एका भयंकर अपघाताची घटना घडली आहे. आता समाज माध्यमावर अभिनेत्रीने अपघाताची घटना प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. प्रिया मलिकने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री शेजाऱ्यांसोबत फोटो काढत असताना हा अपघात झाला आहे. दिव्याच्या ज्योतीमुळे तिच्या कपड्यांना आग लागली आणि संपूर्ण पाठ जळाली.
हेही वाचा: Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला क्लीन चिट; पण, सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब CBI च्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान
प्रियाने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "मी माझ्या शेजाऱ्यांसोबत फोटो काढत होते आणि काही समजण्याआधीच माझ्या उजव्या खांद्यावरून ज्वाला उठताना पाहिल्या आणि जाणवले की माझी संपूर्ण पाठ जळत आहे. मी खऱ्या ज्वालांबद्दल बोलते आहे, एखाद्या छोट्या-मोठ्या आगीबद्दल नाही. सुदैवाने माझ्या वडिलांनी माझे जळते कपडे लगेच फाडले, कारण भाजण्यापासून वाचण्याचा तोच एकमेव मार्ग होता. पण या घटनेने मला आणि आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे."
प्रिया पुढे म्हणाली की, "लोक अनेकदा सुरक्षितपणाकडे दुर्लक्ष करतात आणि असा विचार करतात की आपल्यासोबत काही वाईट होऊच शकत नाही. मात्र काल रात्री मला जाणवलं की एक लहानशी चूकही जीव घेऊ शकते. माझे वडील खरोखरच हिरो आहेत".
प्रियाची प्रकृती आता ठीक असून तिला खांद्यावर आणि पाठीवर जळजळ होत आहे. यंदाची दिवाळी अभिनेत्रीच्या जीवावर बेतली असून आयुष्यभराची शिकवण मिळाली आहे. प्रिया मलिकने आपल्या चाहत्यांना काळजीपूर्वक दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घेण्यासही सांगितलं आहे.