बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इम्रान खान मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर पोहोचला होता. याच ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. या आंदोलनाचा संबंध कॉकक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या हाकेशी होता. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आंदोलनासाठी आझाद मैदान हे ठिकाण निश्चित असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, CJP च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना ईमेलद्वारे परवानगी मागितल्याचा दावा केला आहे. या कारवाईदरम्यान इम्रान खानसह इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. अभिनेता इम्रान खान याने यापूर्वीही या आंदोलनाला सोशल मीडियावरून पाठिंबा दर्शवला होता.