Zaira Wasim got married : बॉलिवूडला तडकाफडकी अलविदा करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने अखेर लग्न केले आहे. ‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या झायरा वसीमने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. झायराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
झायराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी एका फोटोत ती निकाहनाम्यावर (विवाह नोंदणी दस्तऐवज) सही करताना दिसत आहे. तर, दुसरा फोटो तिचा आणि तिच्या पतीचा आहे. या पाठमोऱ्या फोटोत दोघेही चंद्राकडे बघत आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही फोटोंमध्ये झायरा किंवा तिच्या पतीचा चेहरा दिसत नाही. झायरा वसीमचा पती कोण आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
हे फोटो पोस्ट करताना झायरा वसीमने छोटे पण लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे. तिने केवळ ‘Qubool hai x3’ (कुबूल है x 3) असे मोजकेच शब्द लिहिले आहेत. तिच्या या पोस्टवर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत आणि तिला आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा - Purna Aaji Entry : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नव्या 'पूर्णा आजी'ची दमदार एन्ट्री; प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खूश
झायराने बॉलिवूड का सोडले होते?
'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'द स्काय इज पिंक' यांसारख्या सिनेमांमध्ये काम करणारी झायरा वसीम हिने बॉलिवूडमध्ये 5 वर्षे पूर्ण झाल्यावर कलाविश्व सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. “कलाविश्वात माझी प्रगती होत असली, तरी मी इथे आनंदी नाही. हे क्षेत्र मला माझ्या 'ईमान'पासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या मार्गापासून भरकटले होते,” असे तिने त्यावेळी तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
तिच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. तर, काही जणांनी तिने हा निर्णय कोणाच्या तरी दबावाखाली घेतल्याची शंका व्यक्त करत सहानुभूती दाखवली होती. झायरा वसीमने 'स्नो फ्लॉवर्स' या सिनेमातही काम केले आहे.
हेही वाचा - Nikitin Dheer: वडील पंकज धीर यांच्या निधनानंतर निकितिनची पहिली पोस्ट समोर, मृत्यूबद्दल काय सांगितलं?