'Chhaava' box office collection day 29 : 5 कारणे ज्यामुळं ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरहिट
Chhaava box office collection day 29 : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. तब्बल महिनाभरानंतरही प्रेक्षकांच्या उदंड प्रेम मिळत असल्याने छावाची घोडदौड सुरू आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने ५५९.४३ कोटी रुपयांची कमाई करून अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. छावा चित्रपटाच्या या यशामागील नेमकी ५ कारणे काय आहेत, याचा आढावा आपण या लेखातून पाहुयात...
दमदार पटकथा, ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारतीय प्रेक्षकांना ऐतिहासिक चित्रपट विशेष आकर्षित करतात. पण त्यासाठी चित्रपटाचे सादरीकरण प्रभावी असणे गरजेचे असते. ‘छावा’ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची संघर्षमय कथा प्रभावीपणे मांडली आहे. चित्रपटाची पटकथा भावनिक, रंजक आणि थरारक आहेत. या चित्रपटात ऐतिहासिक घटना वास्तवदर्शी पद्धतीने मांडल्या आहेत.
विकी कौशल-रश्मिका मंदाना जोडी
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या ताकदीने साकारली आहे. त्याने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. हिंदी आणि मराठी प्रेक्षक या दोघांच्या अभिनयाने प्रभावित झाले आहेत.
भव्यदिव्य सेट-प्रभावी व्हीएफएक्स
‘छावा’ चे दिग्दर्शन आणि निर्मिती भव्य दर्जाची आहे. युद्धाच्या दृश्यांमध्ये प्रभावी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ऐतिहासिक स्थळे वास्तवदर्शीपणे साकारण्यात आली आहेत. लढाया, राजसभेतील प्रसंग, तसेच मराठा साम्राज्याचे वैभवदर्शक दृश्ये प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत.
समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद
चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने होळी आणि रंगपंचमीच्या सुट्ट्यांचा लाभ घेत मोठी कमाई केली आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक करत भरघोस प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा - 60 व्या बर्थडे पार्टीमध्ये अमीर खानने पापाराझींना करून दिली तिची ओळख! पहा
मराठी कलाकारांचा चित्रपटात ताफा
‘छावा’ मध्ये विकी आणि रश्मिकासह मराठी कलाकारांचा दमदार ताफा आहे. आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, डायना पेंटी यांच्यासह संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांनीही त्यांच्या भूमिका ताकदीने साकारल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाला हिंदी आणि मराठी प्रेक्षकांचा दुहेरी फायदा मिळत आहे.
हेही वाचा - लग्न करण्यापूर्वी 'हे' मराठी चित्रपट पाहिल्याने होईल वैवाहिक जीवन सुखकर
‘छावा’ची ७०० कोटींच्या दिशेने वाटचाल?
छावा चित्रपटाने पठाण, गदर-२, जवान, दंगल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. जर हा चित्रपट पुढील काही आठवडे अशीच कमाई करत राहिला. तर ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.