Monday, November 17, 2025 01:12:10 AM

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझला खलिस्तानी संघटनेकडून धमक्या; KBC चा एपिसोड ठरला वादाचं कारण

गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा वादात अडकला आहे. KBC शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या पायावर वाकल्यानंतर खलिस्तानी संघटनेकडून त्याला धमक्या देण्यात आल्या असून चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.

diljit dosanjh दिलजीत दोसांझला खलिस्तानी संघटनेकडून धमक्या kbc चा एपिसोड ठरला वादाचं कारण

Diljit Dosanjh: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर सतत ट्रेंड होणारा दिलजीत यावेळी चर्चेत आहे ते खलिस्तानी संघटना ‘Sikhs For Justice (SFJ)’ यांनी दिलेल्या धमक्यांमुळे. ही धमकी त्याच्या कौन बनेगा करोडपती (KBC) या शोमधील उपस्थितीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं.

अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिलजीत नुकताच या लोकप्रिय शोच्या एका एपिसोडमध्ये दिसला. या भागात तो अत्यंत आनंदी मूडमध्ये दिसला आणि गप्पांदरम्यान शोच्या शेवटी अमिताभ बच्चन यांच्या पायावर वाकून आशीर्वाद घेतला. नेहमी आदरपूर्वक वागणारा दिलजीतसाठी हा क्षण सहज वाटला असला, तरी काही खलिस्तानी समर्थकांना ही कृती चांगली न वाटल्याचं दिसतं.

हेही वाचा: Mahima Chaudhry: महिमा चौधरीचे वयाच्या 52 व्या वर्षी लग्न झाले?, 'या' अभिनेत्यासोबत दिलेली पोज चर्चेत

या कृतीमुळे SFJ या संघटनेनं दिलजीतवर तीव्र टीका केली आहे. त्यांचा आरोप आहे की, 1984 मध्ये झालेल्या शीख नरसंहारादरम्यान अमिताभ बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक निरपराध लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे अशा व्यक्तींच्या पायाशी नम्र होणं म्हणजे शीख समाजाचा आणि त्या काळातील पीडितांचा 'अपमान' असल्याचं SFJ ने म्हटलं आहे.

संघटनेचे जनरल कौन्सिल गुरपतवंत सिंह पन्नू यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे दिलजीतला धमकी दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, १ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या दिलजीतच्या कॉन्सर्टपूर्वी त्याने हा कार्यक्रम रद्द करावा, कारण तो दिवस शीख समाजासाठी ‘स्मरण दिन’ म्हणून पाळला जातो. पन्नू यांनी म्हटलं की, 'ज्या शिखाला आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू येतो, तो या दिवशी कॉन्सर्ट करूच शकत नाही.'

या पार्श्वभूमीवर दिलजीतने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या पाठीशी उभे आहेत. अनेकांनी संघटनेच्या धमकीचा निषेध करत 'दिलजीतने काही चुकीचं केलं नाही' असं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: Rishab Shetty Career: मराठी नाटकातून घडला कांताराचा स्टार! जाणून घ्या ऋषभ शेट्टीचा अनोखा अभिनय प्रवास

 KBCचा हा विशेष एपिसोड 31 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे, आणि त्याचे प्रोमो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रोमोमध्ये दिलजीतचा विनोदी अंदाज, त्याचं गाणं आणि अमिताभ बच्चन यांच्याशी झालेलं संभाषण पाहून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. पण त्याचवेळी हा एपिसोडच आता नव्या वादाचं केंद्र बनला आहे.

सध्या या प्रकरणावर पोलिस किंवा निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी चाहत्यांना भीती वाटते की या धमक्यांचा दिलजीतच्या परदेशी शोवर परिणाम होऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री