Director Milind Kavde Criticizes Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने हा पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडला आहे. कार्यक्रमातून अचानक एक्झिट घेतल्यानंतर ओंकारने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. मात्र, त्याचा आगामी ‘अफरातफरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या टीममध्ये मोठा राडा झाल्याचे उघड झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एका मुलाखतीदरम्यान ओंकारच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
चित्रपट प्रमोशनला दांडी; 4 महिन्यांपासून फोन उचलत नसल्याचा दावा
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या मुलाखतीला मुख्य भूमिकेत असलेला ओंकार भोजने अनुपस्थित राहिल्याने दिग्दर्शक कमालीचे संतापले. ऑक्टोबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे ओंकारला जूनमध्येच कळवण्यात आले होते, तरीही तो कोणत्याही फोनला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप कवडे यांनी केला. ‘माझा ईपी आणि मी त्याला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु तो फोन उचलत नाही; केवळ ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो’ असा एक टेम्प्लेट मेसेज पाठवतो आणि गेले 4 महिने त्याचा एकही कॉल आलेला नाही,’ असे दिग्दर्शकाने उद्विग्नपणे सांगितले.
हेही वाचा – Bollywood Actor Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा! ‘गदर’ आणि ‘वेलकम’ फेम लोकप्रिय अभिनेत्याचं दीर्घ आजाराने निधन
निर्मात्यांचे अनेक कोटी रुपये पणाला; चित्रपट महामंडळात जाण्याचा इशारा
ज्येष्ठ कलाकार संजय नार्वेकर आणि मोहन आगाशे हे बिझी शेड्यूलमधून वेळ काढून प्रमोशनला हजर राहत असताना ओंकारचे हे वर्तन अनप्रोफेशनल असल्याचे दिग्दर्शकांनी अधोरेखित केले. निर्मात्यांनी एका चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये गुंतवलेले असतात, त्यामुळे किमान प्रमोशनचा एक व्हिडिओ तरी पाठवणे ही कलाकाराची जबाबदारी असते. ओंकारच्या या टाळाटाळीला कंटाळून अखेर निर्मात्यांनी त्याला अधिकृत पत्र पाठवून चित्रपट महामंडळात तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
‘तो माणूस म्हणून अतिशय अनप्रोफेशनल’; पुढील चित्रपटात कास्ट न करण्याचा निर्णय
ओंकार भोजने हा एक कलाकार म्हणून उत्तम असला, तरी माणूस म्हणून अतिशय अनप्रोफेशनल आणि सराईत खोटारडा असल्याचा घणाघाती आरोप मिलिंद कवडे यांनी केला. या संपूर्ण अनुभवातून धडा घेत आता मी कानाला खडा लावला असून भविष्यात कोणत्याही चित्रपटात ओंकारला काम देणार नाही, असा ठाम निर्णय दिग्दर्शकाने जाहीर केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्यामधील हा वाद आता मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.