सचिन पिळगावकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप दाद मिळते मात्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले जाते. अशातच त्यांनी आता ट्रोलिंगवर भाष्य करताना ट्रोलर्सचे कान टोचले आहेत.
सचिन पिळगावकर यांनी नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली. त्यावेळी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर कलाकारांना ज्या प्रकारे ट्रोल केले जाते यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आजकाल खूप जपून व्यक्त व्हावे लागते. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, तुम्ही इतरांच्या सांगण्यानुसार जगावे.
हेही वाचा – Aqua Line Metro Problems : ॲक्वा लाईनकडे विद्यार्थी का फिरवतायत पाठ? 'ती' समस्या कधी होणार दूर ?
पुढे ते म्हणाले की, "प्रेक्षक म्हणून तुम्हाला आमचा सिनेमा आवडला नाही, तर त्यावर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र, आमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र आपण कोणालाही समजावण्यात वेळ वाया घालवू नये".
त्याचप्रमाणे, ट्रोलिंगबद्दल ते म्हणाले की, "जोपर्यंत माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या ट्रोल करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याची गरज नाही. ज्या दिवशी प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने काळजी वाटू लागेल".