Kantara Chapter 1: साऊथ सिनेमाची जादू पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाने केवळ चार दिवसांत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या काळात चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार करत पाच मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. साऊथ ते नॉर्थपर्यंत चित्रपटाची हवा इतकी जोरदार आहे की, अनेक हिंदी बिग बजेट चित्रपटही मागे पडले आहेत.
पहिल्या ‘कांतारा’ने भारतीय प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे या प्रीक्वेलबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आधीपासूनच होती. ऋषभ शेट्टी यांनी या भागात कथानक अधिक विस्तारले असून, कथा, संगीत आणि व्हिज्युअल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘कांतारा चॅप्टर 1’ ने 61.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि दमदार ओपनिंग घेतली.
हेही वाचा: Maharashtra Flood Relief: सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार! सखाराम बाइंडर’ नाटकातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
दुसऱ्या दिवशी कमाई थोडी घसरून 45.4 कोटींवर आली असली, तरी तिसऱ्या दिवशी पुन्हा वाढ झाली आणि चौथ्या दिवशी 61.5 कोटींचा आकडा पार केला. त्यामुळे फक्त चार दिवसांत चित्रपटाने भारतात 223.82 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशी झपाट्याने कमाई करणाऱ्या साऊथ चित्रपटांच्या यादीत ‘कांतारा चॅप्टर 1’ ने स्थान मिळवले आहे.
या चित्रपटाचा बजेट सुमारे 125 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे फक्त तीन दिवसांतच बजेटची भरपाई झाली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने हिंदी भाषेतच 23.5 कोटींची सर्वाधिक कमाई केली आहे, जी स्वतःच एक विक्रम आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनुसार, ‘कांतारा चॅप्टर 1’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर ती एक सांस्कृतिक अनुभूती आहे. ग्रामीण देवस्थळे, श्रद्धा, आणि मानव-निसर्ग यांचं नातं यावर आधारित असलेली ही कथा, त्यातील पार्श्वसंगीत आणि ऋषभ शेट्टींचा दमदार अभिनय प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
विशेष म्हणजे, अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या चित्रपटानंतर पुढचा भाग आणण्याची गरज नाही कारण हा अनुभवच इतका प्रभावी आहे. तरीही शेवटच्या काही दृश्यांमधून पुढील भागाची झलक दिली गेली आहे. त्यामुळे ‘कांतारा चॅप्टर 2’ बद्दलही आता उत्सुकता वाढली आहे.
सध्या या चित्रपटाचा वादळासारखा जोर कायम आहे आणि ट्रेड एक्स्पर्ट्सच्या मते, लवकरच हा चित्रपट 250 कोटींचा टप्पा पार करेल. काहीजण तर म्हणत आहेत की, ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. की कथानक आणि अभिनय यांचा मिलाफ झाल्यास, मोठे स्टार नसले तरी सिनेमाही सुपरहिट ठरतो.