Tuesday, February 17, 2026 07:41:04 AM

Subodh Bhave : "मुंबईपेक्षाही पुणे भयंकर.." सुबोध भावेचा संताप; बस, मेट्रोचा फुकट प्रवास नको, तर.. केली 'ही' मागणी, तुम्हीही कराल कौतुक

सर्वसामान्य माणसाला केवळ फुकट सोयी नकोत, तर त्याला एक सुसह्य आणि चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे. फुकट गोष्टींच्या नावाखाली शहराचा मूळ ढाचा नष्ट केला जात असल्याचा आरोप सुबोधने केला.

subodh bhave  quotमुंबईपेक्षाही पुणे भयंकरquot सुबोध भावेचा संताप बस मेट्रोचा फुकट प्रवास नको तर केली ही मागणी तुम्हीही कराल कौतुक

Subodh Bhave on Free Metro,Bus Traveling : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज, गुरुवारी (15 जानेवारी 2026) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सुमारे 9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हिरिरीने सहभाग घेतला आहे. पुण्यात आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने माध्यमांशी संवाद साधताना प्रशासकीय धोरणांवर आणि शहराच्या ढासळत्या स्वरूपावर अत्यंत जळजळीत शब्दांत आपली मते मांडली.

फुकट मेट्रो आणि बस प्रवासापेक्षा मूलभूत गरजा महत्त्वाच्या
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या फुकट आश्वासनांवर सुबोधने सडकून टीका केली. "फुकट बस किंवा मेट्रो प्रवास देण्यापेक्षा नागरिकांना श्वास घ्यायला मोकळी जागा देताय का? हा खरा प्रश्न आहे," असे सुबोधने ठणकावून सांगितले. सर्वसामान्य माणसाला केवळ फुकट सोयी नकोत, तर त्याला एक सुसह्य आणि चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे. फुकट गोष्टींच्या नावाखाली शहराचा मूळ ढाचा नष्ट केला जात असल्याचा आरोप त्याने यावेळी केला.

शहराचा गळा घोटून 'विकास' नको!
पुण्यातील वाढत्या सिमेंटच्या जंगलावर भाष्य करताना सुबोध म्हणाला की, तीन मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारत उभी करणे म्हणजे विकास नाही. "आपण इमारतींच्या जाळ्यांमध्ये शहराचा गळा घोटतोय, हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये," अशी खंत त्याने व्यक्त केली. केवळ जुनी बांधकामे पाडून तिथे टोलेजंग इमारती उभ्या केल्याने पार्किंग, गर्दी आणि प्रदूषणाचे प्रश्न गंभीर होत आहेत. विकास हा माणसांना जगण्यासाठी असला पाहिजे, त्यांचा जीव गुदमरण्यासाठी नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्याने आपले मत मांडले.

पुण्यात लहान मुलांसाठी मैदानच शिल्लक नाही!
सुबोध भावेने गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील मैदाने कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. "पुण्यासारख्या शहरात आजही लहान मुलांना खेळायला एकही हक्काचे सार्वजनिक मैदान शिल्लक नाही," असे त्याने नमूद केले. जी काही मैदाने उरली आहेत, ती खासगी संस्थांच्या ताब्यात असल्याने तिथे बाहेरच्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. लहान मुलांनी खेळायला आणि वृद्धांनी फिरायला कुठे जायचे? केवळ सारसबाग आणि पेशवे पार्कवर किती काळ अवलंबून राहायचे? असा सवाल त्याने प्रशासनाला विचारला आहे.

हेही वाचा - Tejaswini Pandit Post : 'तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा...'; राज ठाकरेंना तेजस्विनी पंडितची कवितेतून साद

नागरिकांचा 'दबावगट' निर्माण करण्याची गरज
केवळ मतदान करून नागरिकांची जबाबदारी संपत नाही, असे सुबोधचे ठाम मत आहे. "दुर्दैवाने आज नागरिकांचा कोणताही प्रभावी दबावगट उरलेला नाही," अशी खंत त्याने व्यक्त केली. जोपर्यंत नागरिक एकत्र येऊन लोकप्रतिनिधींच्या कामावर लक्ष ठेवत नाहीत, तोपर्यंत राजकारणी आश्वासने पाळणार नाहीत. आपल्या वॉर्डात होणाऱ्या प्रत्येक कामात नागरिकांचा सहभाग आणि देखरेख असणे आवश्यक आहे, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल आणि शहरांचे आरोग्य जपले जाईल.

पुण्याचे स्वरूप आता मुंबईपेक्षाही भयंकर
आपल्या जन्मभूमीबद्दल, पुण्याबद्दल बोलताना सुबोध भावूक झाला. "मला पुणे शहराचा प्रचंड अभिमान आहे, कारण याच शहराने मला शिक्षण आणि करिअर दिले. पण आज पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षाही भयंकर होत चालले आहे," असे त्याने म्हटले. नियोजनशून्य वाढ आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे पुणेकरांचे जीवन कठीण होत असल्याची भीती त्याने व्यक्त केली. शहराचा 'श्वास' टिकवून ठेवण्यासाठी आता ठोस कृतीची वेळ आल्याचे त्याने सुचवले.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा!
आज मतदान केल्यानंतर जे लोक महापालिकेत जातील, त्यांच्या प्रत्येक निर्णयावर नागरिकांनी गप्प बसून राहू नये, असा सल्ला सुबोधने दिला. "आपण ज्यांना निवडून देतो, त्यांच्या मागे लागून आपल्या समस्या सोडवून घेणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण आज गप्प बसलो, तर नंतर तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही," असे त्याने स्पष्ट केले. मतदानाच्या टक्केवारीवर भाष्य करताना त्याने जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.

शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या मूलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे हाच खरा विकास आहे, असे सुबोध भावेने शेवटी नमूद केले. "मराठीच्या मुद्द्यापेक्षा आता शहरे सुदृढ राहणे आणि नागरिकांना मोकळ्या हवेत श्वास घेता येणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे," असे म्हणत त्याने राजकारण्यांच्या आश्वासनांकडे दुर्लक्ष करून वास्तवाकडे बघण्याचे आवाहन सर्व सामान्य जनतेला केले आहे.

हेही वाचा - Shashank Ketkar Thane Video : "ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या मागे..." मतदान केल्यानंतर शशांकने दाखवली ठाण्यातील खरी परिस्थिती


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या