Suruchi Adarkar And Piyush Ranade Good News: मराठी कलाविश्वातून सध्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे हे आई-बाबा झाले आहेत. घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सुरुचीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर बाळाच्या छोट्याशा हाताचा फोटो शेअर करत या जोडप्याने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. ‘आमच्या आयुष्यात एका सुंदर टीममेटचे आगमन झाले आहे,’ अशा भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात जाहीर केली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच कन्यारत्न झाल्याने जोडप्याच्या घरी साक्षात लक्ष्मीचे आगमन झाल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
श्रेया बुगडेची भावूक कमेंट; मराठी सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
सुरुची आणि पियुषच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पियुषला मानलेली बहीण मानणाऱ्या अभिनेत्री श्रेया बुगडेने अत्यंत आनंदाने कमेंट करत ‘माझ्या बाळांना बाळ झाले, आनंदी आत्या!’ अशा भावना व्यक्त केल्या. श्रेया आणि पियुष यांनी एका मालिकेत एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात भाऊ-बहिणीचे घट्ट नाते आहे. श्रेयाव्यतिरिक्त गिरीजा प्रभू, नम्रता संभेराव, ऐश्वर्या नारकर, अभिजित खांडेकर, अद्वैत दादरकर आणि ऋतुजा बागवे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी चिमुकलीवर आणि नवीन आई-बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘अंजली’ मालिकेच्या सेटवरून जुळली रेशीमगाठ अन् डिसेंबर 2023 मध्ये बांधली लग्नगाठ
सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी डिसेंबर 2023 मध्ये अत्यंत साधेपणाने विवाहगाठ बांधली होती. झी युवा वाहिनीवरील ‘अंजली – झेप स्वप्नांची’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवरच त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन त्यांनी एकत्र संसार सुरू केला. लग्नाच्या खुशबरीनंतर आता त्यांनी ही गोड बातमी चाहत्यासोबत शेअर केली आहे. हे जोडपे आपल्या आयुष्यात या नव्या पाहुणीचे आगमन झाल्याने सध्या प्रचंड आनंदात आहे.
हेही वाचा – महानायक अमिताभ बच्चन यांचा 84 वा वाढदिवस; चाहत्यांकडून होतोयं शुभेच्छांचा वर्षाव
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ते साड्यांचा ब्रँड; सुरुची-पियुषचा व्यावसायिक प्रवास
सुरुची अडारकर ही शेवटची झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ‘अस्तिका’ या नकारात्मक आणि लक्षवेधी भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे यांच्यासोबत साड्यांचा एक नवा ब्रँडही सुरू केला आहे. दुसरीकडे, अभिनेता पियुष रानडे हा ‘काव्यांजली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. या दोघांनीही मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूडपाठोपाठ मराठी इंडस्ट्रीतही आनंदाचे वातावरण; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
गेल्या काही दिवसांत मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी गुडन्यूज शेअर केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या दुसऱ्या गरोदरपणाची चर्चा असतानाच, आता मराठी इंडस्ट्रीतील या लोकप्रिय जोडप्याने थेट आई-बाबा झाल्याची बातमी दिल्याने चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांवर आणि त्यांच्या नवजात बाळावर शुभेच्छा आणि आशीर्वादांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा – ‘देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जातोय…’; CJP च्या आंदोलनावरून कंगना रणौतचा गंभीर आरोप
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.