‘देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जातोय…’; CJP च्या आंदोलनावरून कंगना रणौतचा गंभीर आरोप

भाजप खासदार कंगना रणौत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आंदोलकांवर व विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जातोय…’; CJP च्या आंदोलनावरून कंगना रणौतचा गंभीर आरोप
Kangana Ranaut

‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पुकारलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. CJP चे प्रमुख कार्यकर्ते अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांना दिल्लीत दाखल होताच विमानातूनच ताब्यात घेण्यात आले असून, देशातील विविध भागांतून आंदोलकांची धरपकड सुरू आहे. या घडामोडींवर भारतीय जनता पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, भाजप खासदार कंगना रणौत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आंदोलकांवर व विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्रास देण्यासाठी रचले जात आहेत कट – कंगना रणौत

या आंदोलनावर कडक शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या, “देशविरोधी घटक, दहशतवादी शक्ती आणि आंतरराष्ट्रीय कट हे सध्या आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत चिंतेचे विषय बनले आहेत. देशाला आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास देण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाखाली सातत्याने विविध कट रचले जात आहेत.” लोकशाहीच्या नावाखाली देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“विकासाला अस्थिर करण्याचा परकीय शक्तींचा प्रयत्न” – नितीन नवीन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पत्रकार परिषदेत CJP कार्यकर्त्यांवर आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीवर थेट निशाणा साधला. हे आंदोलन भारताच्या प्रगतीला आणि विकासाला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “सध्याच्या सर्व घडामोडी या परकीय शक्तींच्या सांगण्यावरून घडत आहेत. CJP आणि ‘इंडिया’ आघाडीचा एकमेव उद्देश देशाला अस्थिर करणे हाच आहे. मात्र, देशवासीय हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून, तुमचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.” जनता जनार्दनाने ज्यांना निवडणुकांमध्ये नाकारले आहे, तेच लोक आता परकीय शक्तींच्या जोरावर देशविरोधी कट रचत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात CJP ची उच्च न्यायालयात धाव; याचिकेत केली ‘ही’ मोठी मागणी

दिल्लीला किल्ल्याचे स्वरूप; सीमांवर कडक नाकाबंदी

दुसरीकडे, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. प्रशासनाने संपूर्ण राजधानीला एखाद्या कडक किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक करण्यात आली असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवी दिल्लीतील अनेक संवेदनशील परिसर आणि रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number