मराठी कलाकारांच्या अभिनयाचा पाया हा रंगभूमी असतो, तर कामाची सुरुवात टीव्हीवरील मालिकांमधून होताना दिसते. ‘तू तिथे मी’ या मालिकेपासून सुरुवात करणारे मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी पुन्हा एकदा मालिकाविश्वात पाऊल ठेवले आहे. मात्र यावेळी अभिनेता म्हणून नव्हे, तर लेखक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘मराठी मीडियम’ या मालिकेचे लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. मात्र या मालिकेच्या कास्टिंगवरून त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
नेमके प्रकरण काय?
12 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर ‘मराठी मीडियम’ ही मालिका सुरू झाली आहे, ज्यात रीलस्टार श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुकही केले जात आहे, मात्र इतर चांगल्या कलाकारांना डावलून ही भूमिका श्रद्धाला देण्यात आली, कारण ती रीलस्टार आहे आणि तिचे फॉलोअर्स चांगले आहेत, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या ट्रोलिंगवर चिन्मय मांडलेकर यांनी थेट उत्तर देत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत.
हेही वाचा – ‘मी रेड फ्लॅग आहे का?’ कॉफी विथ करणमधील वक्तव्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना विजयने सुनावलं
काय म्हणाले चिन्मय मांडलेकर?
चिन्मय म्हणाले, “असं खरं तर होत नाही. श्रद्धा रीलस्टार आहे हे मला आता कळतंय. मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. साधारणपणे माझ्या माहितीनुसार जवळजवळ 35 ते 40 मुलांचं आणि मुलींचं ऑडिशन झालंय आणि त्यातून निवडलेली ही दोन लोकं आहेत. त्यांचं ऑडिशन त्यांच्या आधीच्या कामावरून किंवा ते सोशल मीडियावर काय टाकतात यावरून नाही झालंय. आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली होती आणि ते सीन्स वेगवेगळ्या पद्धतीने केल्यानंतर ही जोडी निर्मिती संस्थेने आणि वाहिनीने निवडली. त्यामुळे आपण त्यांनी जो संघर्ष करून हा जो रोल मिळवला आहे त्याची किंमत कमी नाही केली पाहिजे. तसे तर रील्स खूप लोक करतात आणि मला त्यात काही गैर वाटत नाही.”
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
ते पुढे म्हणाले, "आताच्या पिढीकडे रील्स हे माध्यम आहे त्यामुळे ते त्यातून त्यांची कला दाखवतात. पूर्वी हा प्रकारच नव्हता, आता तर अनेक कलाकारही रील्स करतात मग त्यांनाही आपण बोलायचं का?"
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिका आणि 'द काश्मीर फाईल्स'मधील बिट्टा कराटेच्या भूमिकेमुळे चिन्मय मांडलेकर विशेष ओळखले जातात. तसेच त्यांनी 'दुनियादारी' या हिट मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली असून, मनोज वाजपेयी अभिनीत 'इन्स्पेक्टर झेंडे (Inspector Zende, 2025)' हा त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-