मुंबई : आषाढी एकादशीच्या शुभ पर्वानंतरच्या दुसऱ्याच दिवशी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिंदुस्तानी शास्त्रीय गायक महेश काळे यांनी आपली अत्यंत लोकप्रिय मैफल मालिका ‘अभंगवारी’ सादर केली आणि मुंबईत भक्ती, संगीत व भावपूर्ण वातावरणाची अनुभूती घेतली गेली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. त्यांनी महेश काळे यांच्या एका नवीन आणि हृदयस्पर्शी रचनेचे ‘लहानपण देगा देवा…’ अनावरणही केले. ही रचना 17 व्या शतकातील संत तुकाराम यांच्या अजरामर अभंगावर आधारित आहे. तसेच, या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचीही विशेष उपस्थिती होती.
सध्या भारतभर मोठ्या दौऱ्यावर असलेला महेश काळे यांचा ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर येथे झालेल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय दौऱ्यानंतर भारतात सादर होत आहे. जिथे त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जवळपास दहा वर्षांपूर्वी महेश काळे यांनी संकल्पित केलेला ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी परंपरेतून प्रेरित आहे. ज्यांना प्रत्यक्ष वारीची यात्रा करणे कदाचित कधीच शक्य होणार नाही, अशा लोकांपर्यंत या तीर्थयात्रेचा आध्यात्मिक अनुभव पोहोचवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कालातीत अभंगवाणीच्या माध्यमातून हा कार्यक्रम वारीतील भक्ती, शरणागती आणि सामूहिक ऊर्जेचे वातावरण पुन्हा जिवंत करतो. ज्यामुळे प्रत्येक सादरीकरण हा एक सामूहिक आध्यात्मिक अनुभव ठरतो आणि संगीत हेच विठ्ठलप्राप्तीचे माध्यम बनते.
कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन भावूक झाल्याचे दिसून आले. त्या महेश काळे यांच्यासोबत गाण्यात सहभागी झाल्या आणि प्रेक्षकांसोबत ‘विठ्ठल’ नामाचा जयघोषही केला. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकातील हंपी येथील एका प्रसंगाची आठवण सांगितली, जिथे दोन तरुणांनी त्यांना विचारले होते की त्या स्वतःला तणावमुक्त आणि ऊर्जित कसे ठेवतात. त्या म्हणाल्या, “मी त्यांना सांगितले की, संगीत ऐकणे हाच स्वतःला ऊर्जित करण्याचा माझा मार्ग आहे. मला प्रामुख्याने कर्नाटक संगीताची अधिक ओळख आहे. पण जेव्हा त्यांनी मला विचारले की मी हिंदुस्तानी संगीतही ऐकते का, तेव्हा माझ्या मनात आलेले पहिले नाव महेश काळे हे होते.” त्यांनी पुढे सांगितले की, काळे यांच्या टीममधील एका व्यक्तीच्या कानावर तो संवाद पडला आणि त्यानंतर त्यांनी त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. “महेश काळे यांना प्रत्यक्ष (live) ऐकणे हा एक अद्भुत अनुभव होता आणि त्यातही आषाढी एकादशीनंतर लगेचच ही संधी मिळणे… मी याला नाही म्हणूच शकले नसते!” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. गायकाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, “त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा आहे. त्यांचा आवाज, श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि संगीताच्या माध्यमातून ते देत असलेला संदेश थेट हृदयाला भिडतो. ते दीर्घायुषी व्हावेत, अशी मी माता सरस्वतीकडे प्रार्थना करते.”
महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करून तो जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या काळे यांच्या अढळ निष्ठेचे आशिष शेलार यांनी कौतुक केले. अमेरिकेतील काळे यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीची आठवण सांगताना शेलार यांनी नमूद केले की, भारतापासून हजारो मैल दूर राहत असूनही, काळे यांनी भारतीय मूल्ये, संगीत आणि संस्कृतीवर आधारित अशा एका घराची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये एखाद्या ‘संगीत आश्रमा’चे चैतन्य आणि वातावरण अनुभवता येते. ही बाब त्यांना अत्यंत प्रभावी वाटली.
संपूर्ण मैफिलीत भक्तीभावाचे पवित्र वातावरण होते. काळे यांनी ‘राम कृष्ण हरी’ या अजरामर अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर ‘जगदोद्धारण’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘विठ्ठला’, ‘अबीर गुलाल’ यांसारख्या लोकप्रिय अभंगांच्या माध्यमातून रसिकांना एका हृदयस्पर्शी संगीतमय प्रवासावर नेले. सर्व वयोगटांतील रसिकांनी खच्चून भरलेले सभागृह या अनुभवात पूर्णपणे तल्लीन झाले होते. अनेकजण गाण्यांच्या तालावर हळुवार डोलत होते, काळे यांच्यासोबत गात होते, शांतपणे चिंतन करत डोळे मिटून बसले होते आणि अनेकांच्या डोळ्यांत भावपूर्ण अश्रूही तरळले होते.
मुंबईतील ‘अभंगवारी’ कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी महेश काळे यांचे कौतुक केले. “त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा आहे, त्यांना दीर्घायुष्य लाभो.” या सायंकाळच्या वातावरणाचे वर्णन करताना, निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिसंगीताचा आनंद घेण्याच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. लहानपणी आपल्या पालकांसोबत भागवत कथा, रामायण कथा आणि शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याच्या आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या की, आजची पिढी अनेकदा आपला वेळ मोबाईल फोनवर घालवत असली, तरी ‘अभंगवारी’सारख्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून मिळणाऱ्या अनुभवाची जागा कशानेही भरून काढता येणार नाही. “आपण महेश यांच्यासारख्या कलाकारांचे संगीत ऐकण्याकडे पुन्हा वळले पाहिजे. त्यांचे संगीत केवळ ऐकले जात नाही, तर ते मनाला स्पर्श करते आणि अंतर्मनावर प्रभाव पाडते. या कार्यक्रमातून निर्माण होणारी स्पंदने आणि श्रोत्यांचा सहभाग खरोखरच अतुलनीय आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, असा अविस्मरणीय अनुभव घडवून आणल्याबद्दल त्यांनी महेश काळे, त्यांच्या पत्नी पूर्वा काळे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.