Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने याच्यावर ‘अफरातफरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता या प्रकरणात अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकारला ‘सराईत खोटारडा’ आणि ‘अत्यंत अनप्रोफेशनल’ म्हणत त्याच्यावर प्रमोशनला दांडी मारल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण वादावर मौन सोडत ओंकारने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली असून, दिग्दर्शकाच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘मी टीमच्या संपर्कात आहे; दिग्दर्शक असं का म्हणाले माहिती नाही’
दिग्दर्शकाने केलेल्या आरोपांचे खंडन करताना ओंकार भोजने म्हणाला की, तो चित्रपटाच्या ईपी (EP) आणि निर्मिती टीमसोबत सतत संपर्कात आहे. ‘दिग्दर्शक मिलिंद कवडे माझ्याबद्दल असं का म्हणाले? हे मला खरोखर माहिती नाही, पण मी योग्य वेळी नक्कीच याचं उत्तर देईन,’ असे ओंकारने स्पष्ट केले. चार महिन्यांपासून फोन उचलत नसल्याच्या आणि मेसेज पाठवून लटकवून ठेवल्याच्या आरोपांवर त्याने या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आगामी प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होण्याचे आश्वासन
चित्रपटाच्या प्रसिद्धीपासून दूर पळत असल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर ओंकारने आपण आगामी सर्व प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जून महिन्यातच ऑक्टोबरमधील प्रदर्शनाची कल्पना देऊनही ओंकारने सहकार्य केले नसल्याचा दावा दिग्दर्शकांनी केला होता. मात्र, आता ओंकारने स्वतः प्रमोशनमध्ये उतरण्याची घोषणा केल्यामुळे चित्रपट टीममधील वाद मिटणार की आणखी चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंकित मोहनबाबतही असाच वाद; ‘अफरातफरी’च्या प्रदर्शनापूर्वी चर्चांना उधाण
विशेष म्हणजे केवळ ओंकार भोजनेच नव्हे, तर अभिनेते अंकित मोहन यांच्याबाबतही अशाच स्वरूपाचा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर रुपेरी पडद्यावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या ओंकारच्या या वादग्रस्त प्रकरणामुळे ‘अफरातफरी’ चित्रपट सध्या भलताच चर्चेत आला आहे. ओंकारने दिलेल्या या खुलाशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि चित्रपटाचे निर्माते काय भूमिका घेतात, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचे डोळे लागले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.