नवी दिल्ली: ‘इंडियन आयडल’ फेम प्रशांत तामांग यांचे आज, 11 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीत निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळून आले असून हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्सनंतर ते नुकतेच दिल्लीत परतले होते. कोणत्याही गंभीर आजाराची तक्रार त्यांनी यापूर्वी केल्याचे समोर आलेले नाही.
कोलकाता पोलिस दलातील कॉन्स्टेबल ते देशभरात ओळखला जाणारा कलाकार असा त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. 2007 मध्ये Indian Idol च्या तिसऱ्या पर्वाचे विजेते ठरल्यावर ते राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आले. अलीकडेच त्यांनी वेबसीरिज Paatal Lok सीझन 2 मध्ये ‘डॅनियल लेचो’ ही भूमिका साकारून आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष प्रशंसा मिळवली होती. ‘Bir Gorkhali’ आणि ‘Asare Mahinama’ यांसारखी त्यांची गाणी आजही सांस्कृतिक अस्मितेची प्रतीके मानली जातात.
प्रशांत तामांग यांचा संघर्षमय प्रवास हा भारतीय रिअॅलिटी टीव्ही इतिहासातील सर्वात भावनिक म्हणून ओळखला जातो. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपल्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. दार्जिलिंग, गोरखा समाज आणि ईशान्य भारतातून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्यांचा विजय केवळ एका कार्यक्रमाचा निकाल न राहता एक सांस्कृतिक आंदोलन ठरला होता.
कौटुंबिक आयुष्यातही प्रशांत तामांग अतिशय साधे होते. 2011 मध्ये त्यांनी नागालँडमध्ये गीता थापा यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी गीता थापा आणि मुलगी आरिया असा परिवार आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी कुटुंबालाच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले होते.
त्यांची शेवटचा इंस्टाग्राम पोस्ट 30 डिसेंबर 2025 रोजीचा असून त्यात दुबईतील लाईव्ह कार्यक्रमातील काही क्षण त्यांनी शेअर केले होते. “उत्साहाने भरलेली गर्दी आणि जबरदस्त व्हायब्स,” असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर या पोस्टखाली चाहत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या असून “हे विश्वास बसत नाही”, “RIP”, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संगीत आणि मनोरंजन विश्वाने आज एक प्रेरणादायी कलाकार गमावला आहे.