राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ दिग्दर्शकाचं निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आपल्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करत भारतीय सिनेमावर आपली अमिट छाप सोडली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ दिग्दर्शकाचं निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Singitham Srinivasa Rao Death

Singitham Srinivasa Rao Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रयोगशील आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि संगीतकार सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन झाले आहे. शनिवारी, 3 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. आपल्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करत भारतीय सिनेमावर आपली अमिट छाप सोडली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

वयाच्या 94 व्या वर्षी दिग्दर्शित केला शेवटचा चित्रपट

आपल्या वेगळ्या आणि प्रयोगशील शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंगीथम यांनी वयाच्या 94 व्या वर्षीही आपली चित्रपटांप्रतीची निष्ठा कायम ठेवली होती. त्यांनी ‘सिंग गीथम’ हा आपला शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला. वृत्तानुसार, वयोमानापरत्वे उद्भवलेल्या आजारपणामुळे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मूकपट असलेल्या ‘पुष्पक’पासून ते टाईम ट्रॅव्हलवर आधारित ‘आदित्य 369’ सारख्या काळाच्या पुढील चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवला.

ज्युनियर एनटीआर आणि कमल हासन यांच्याकडून भावूक श्रद्धांजली

सिंगीथम श्रीनिवास राव यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा – प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; कुख्यात गँगस्टर टोळीने स्वीकारली जबाबदारी

ज्युनियर एनटीआर यांची पोस्ट

ज्युनियर एनटीआरने म्हटलं आहे की, “सिंगीथम श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ‘आदित्य 369’, ‘पुष्पक’ आणि ‘मयूरी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी काळाच्या पुढचा दृष्टिकोन मांडला. हे चित्रपट आजच्या पिढीलाही तितकेच ताजेतवाने वाटतात. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.

कमल हासन यांच्या भावना

कमल हासन यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले, “आज सकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी सदैव अमर राहतील. मृत्यू हा केवळ शोकांतिका नसून तो गौरवशालीही असू शकतो, सिंगीथम हे याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी ज्या प्रकारे समृद्ध आयुष्य जगले, तसेच आयुष्य जगण्याची माझीही इच्छा आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version