Samantha Baby Shower: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या आयुष्यातील एका अतिशय सुंदर आणि नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे. पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लवकरच पहिल्या अपत्याचे स्वागत करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आता चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. याच आनंदाच्या पार्श्वभूमीवर समंथा आणि राज यांनी एका खास पारंपरिक सोहळ्यात डोहाळ जेवणाचा (Baby Shower) कार्यक्रम पार पाडला. पिवळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात, अत्यंत साध्या आणि आकर्षक लूकमध्ये समंथा या सोहळ्यात अतिशय सुंदर दिसत होती.
श्रीविद्या परंपरेनुसार पार पडले विशेष धार्मिक व आध्यात्मिक विधी
हा सोहळा केवळ एका कौटुंबिक किंवा औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता, तर याला एक विशेष पूजनाची जोड देण्यात आली होती. ईशा फाउंडेशनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रीविद्या उपासक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत काही प्राचीन विधी करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यत्वे 'कला आवरण' नावाचा एक पवित्र विधी संपन्न झाला, ज्यामध्ये देवीच्या 94 कलांचा संबंध होणाऱ्या आईच्या सात चक्रांशी जोडला जातो. पवित्र जल, मंत्रोच्चार आणि श्रीचक्र यंत्राच्या पूजनाद्वारे गर्भातील बाळ आणि आईभोवती सकारात्मक ऊर्जेचे सुरक्षा कवच निर्माण केले जाते, असे या विधींचे महत्त्व असल्याचे समंथाने स्पष्ट केले.
हेही वाचा – Ganesh Chaturthi 2026: साधेपणातच सौंदर्य! नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाचे थाटात स्वागत..
'होणाऱ्या आईला देवीचे रूप मानले जाते'; समंथाची भावूक पोस्ट
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत समंथाने भारतीय परंपरांविषयीचा आदर व्यक्त केला. तिने लिहिले की, 'मला प्रत्येक विधीमागचा गूढ अर्थ समजतोच असे नाही, पण शतकानुशतके जतन केलेल्या या परंपरांमागे आणि मंत्रोच्चारातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमध्ये एक अगाध शक्ती दडलेली आहे, यावर माझा विश्वास आहे.' या विधीमध्ये एका स्त्रीला आणि होणाऱ्या आईला देवीचे रूप मानून तिचा सन्मान केला जातो, ही गोष्ट आपल्या मनाला स्पर्शून गेल्याचे तिने नमूद केले.
राज निदिमोरू आणि जवळच्या नातेवाईकांची सोहळ्याला उपस्थिती
या आध्यात्मिक डोहाळ जेवणाच्या सोहळ्यात पती राज निदिमोरू समंथासोबत सर्व विधींमध्ये सहभागी झाले होते. एका दृश्यामध्ये राज हे समंथावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करताना दिसत आहेत. याशिवाय कुटुंबातील सदस्य आणि जवळचे काही मित्रही या खास क्षणाचे साक्षीदार बनले होते. सोशल मीडियावर या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असून, समंथाच्या या अनोख्या आणि सात्त्विक डोहाळेजेवणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.