मुंबई: महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि लिखित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा टीझर 1 ऑक्टोबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात सादर करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने, आजवर न पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप आणि मराठी बाणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आज सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातील सिद्धार्थ जाधवचा धडकी भरवणारा लूक समोर आला आहे. 'सैतान आला सैतान माजवी रक्त थैमान... छळ कपटाचं तूफान लाल रक्तानं अस्मान', असं कॅप्शन देत सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवा लुक शेअर केला आहे. हा लुक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे की, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात सिद्धार्थ जाधव कोणती भूमिका साकारणार आहे.
चित्रपटातील नव्या लुकबद्दल सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया
'या चित्रपटात मी माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात अनोखी भूमिका साकारणार आहे. या पात्राची क्रूरता त्याच्या लुकमध्ये टिपणे खूप महत्त्वाचे होते. खरंतर, या लूकसाठी मी महेश सरांचं आभार मानतो. महेश सरांनी माझा एक फोटो पाठवायला सांगितलं आणि त्यांनी माझ्या फोटोवर काम करून चित्रपटासाठी माझा नवा लूक तयार केला. हा लूक पाहताच, मी आर्श्चर्यचकित झालो. मी असाही दिसू शकतो का? असा प्रश्न मला पडला. यापूर्वी मी कधीही अशा प्रकारची भूमिका साकारली नाही. मला महेश सरांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या भूमिकेबाबत मला फार काही बोलणार नाही. मात्र, मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल', अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ जाधवने दिली आहे.
हेही वाचा: Rishabh Tondon: गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (फकीर) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संगीतविश्वात शोककळा
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत आहे. सिद्धार्थसह, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री, तसेच, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा महेश मांजरेकरांनी लिहिली असून चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.