Sonali Kulkarni on Ashok Kharat: दैवी शक्तीचा बनाव रचून शेकडो महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदू बाबाच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील भीषण वास्तव समोर येत असतानाच, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अत्यंत जळजळीत शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक ओळखण्याची आता तरी वेळ आली आहे,” अशा शब्दांत तिने समाजाला आरसा दाखवला आहे.
काय आहे सोनालीची फेसबुक पोस्ट?
सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणातील दांभिकतेवर प्रहार केला आहे. तिने म्हटले आहे की, “महिलांवर होणारे घृणास्पद अत्याचार, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक पाहून प्रचंड संताप येतोय. अजूनही आपण ‘आमच्याच धर्मातली अंधश्रद्धा का दिसते’ असे म्हणत गप्प बसणार आहोत का? आपल्या उंबरठ्यावर पडलेली ही घाण आपल्यालाच स्वच्छ करावी लागेल. कुणाची अस्वच्छता पवित्र आणि कुणाची दुर्गंधी, असा भेदभाव करून चालणार नाही. आपण ठगले जातोय, आता तरी जागे व्हा!”
खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र संतप्त
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती 58 धक्कादायक व्हिडिओ लागले असून, त्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, केवळ सोनालीच नव्हे तर अतुल कुलकर्णी आणि सचिन गोस्वामी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनीही या विकृतीचा निषेध केला आहे.
नेटकऱ्यांचा संताप अन् प्रतिक्रिया
सोनालीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, “पुरोगामी महाराष्ट्र हा केवळ नावापुरता उरला आहे का? जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोक आणि राजकारणी अशा भोंदूगिरीला पाठबळ देतात, तेव्हा सर्वसामान्य माणसाचे जगणे असह्य होते.” अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘काळाबाजार’ थांबवण्यासाठी समाजाने वैचारिक प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन सोनाली कुलकर्णीने आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. तिची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.