Tuesday, November 11, 2025 08:27:21 PM

Sandhya Shantaram: 'पिंजरा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या संध्या यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

sandhya shantaram पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sandhya Shantaram Passes Away: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या संध्या यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. व्ही. शांताराम यांच्या पत्नी असलेल्या संध्या शांताराम यांनी आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला होता. शनिवारी शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा - Fraud Case: फरहान अख्तरच्या आईची 12 लाखांची फसवणूक; ड्रायव्हर आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

किरण शांताराम यांनी त्यांच्या आईच्या निधनाची माहिती देताना सांगितले, 'गेल्या काही दिवसांपासून संध्या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले आणि आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले.' दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्स अकाऊंटवर संध्या शांताराम यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले, 'पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषतः ‘पिंजरा’मधील भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!' 

हेही वाचा - Rashmika-Vijay Engagement: रश्मिका-विजयचं नातं पुढच्या टप्प्यावर; गुपचूप उरकला साखरपुडा ; 'या' महिन्यात होणार लग्न

‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट इतिहासातील एक आयकॉनिक सिनेमा मानला जातो. या चित्रपटातील नर्तकीच्या भूमिकेत संध्या शांताराम यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील नर्तकी यांच्यातील भावनिक प्रेमकथेला त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केले.  ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनयाची वेगळी छाप सोडली. मात्र, ‘पिंजरा’मधील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीचा शिखरबिंदू ठरली. आज त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री