मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच, अबू आझमी आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी आज भिवंडी दौऱ्यावर होते. यादरम्यान, अबू आझमींनी हिंदी भाषेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, यावेळी जेव्हा अबू आझमींना मराठी भाषेत प्रतिक्रिया देण्याबाबत विचारल्यावर अबू आझमी म्हणाले की, 'मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण मराठीची काय आवश्यकता आहे? हे भिवंडी आहे. जर मराठी भाषेतील बाईट दिल्लीत आणि यूपी राज्यात गेली, तर कोणाला समजणार आहे का?'.
अबू आझमींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मनसे ठाणेचे जिल्ह्याध्यक्ष परेश चौधरी म्हणाले की, 'अबू आझमी, तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करत आहात. महाराष्ट्रात राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैयांची पर्वा का करता? भिवंडी हे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच चालेल'.
हेही वाचा: PM Narendra Modi At RSS Centenary : 'राष्ट्र प्रथम' तत्त्वावर RSS कार्यरत; संघाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले संघकामगिरीचे कौतुक
विकास कामाबाबत अबू आझमी काय म्हणाले?
याचबरोबर, भिवंडी पालिकेच्या विकास कामाबाबत अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली. 'भिवंडी नगरपालिकेच्या विकास आराखड्यातील नवीन तरतुदींनुसार, शहरातील कल्याण रोडवरील हजारो निवासी घरे, व्यावसायिक, दुकानदार, मंदिरे आणि मशिदी नुकसानग्रस्त होत आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने इथे कारवाई करू नये', अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी, अबू आझमींसह कल्याण रोड व्यापारी रहिवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी शादाब उस्मानी, राम लहारे, दीन मोहम्मद उपस्थित होते.