नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिकने त्याचा मुलगा अगस्त्य आणि अगोदरची पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांना आलिशान लँड रोव्हर डिफेंडर ही लक्झरी एसयूव्ही भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. दोघे वेगळे झाल्यानंतरही हार्दिक नताशा आणि मुलाची जबाबदारी सांभाळत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या लक्झरी एसयूव्हीची किंमत सुमारे तीन ते चार कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात असून काही अहवालांनुसार तिची किंमत जवळपास चार कोटी रुपये आहे. मुंबईतील लँड रोव्हरची अधिकृत डीलर कंपनी ‘नवनीत मोटर्स’ यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नताशा आणि अगस्त्य यांचा नवीन कारसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी जुलै 2024 मध्ये अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विभक्त झाल्यानंतरही हार्दिक त्याच्या कुटुंबाशी जोडलेले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हार्दिक सध्या अभिनेत्री महिका शर्मा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
अलीकडेच भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान महिका शर्मा हार्दिकसोबत कोलंबो येथे उपस्थित होती. तसेच 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या झालेल्या महिकाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने तिला तब्बल 25 भेटवस्तू दिल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगली होती. या सेलिब्रेशनचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही हार्दिक पंड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर आठ फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबाद येथे महत्त्वाचा सामना रंगणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नसल्याने या सामन्यात हार्दिककडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.