Friday, February 13, 2026 07:37:52 PM

KDMC Election Result: कोण म्हणतं राजकारण फक्त धनदांडग्यांचं? मतदारांच्या अपार विश्वासावर 'या' पठ्ठ्याने उधळला विजयाचा गुलाल

कोणतीही आर्थिक ताकद नसताना नागरिकांच्या वर्गणी आणि पाठबळावर मिळालेला हा विजय भारतीय लोकशाहीत जनशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.

kdmc election result कोण म्हणतं राजकारण फक्त धनदांडग्यांचं मतदारांच्या अपार विश्वासावर या पठ्ठ्याने उधळला विजयाचा गुलाल

कल्याण: राजकारण म्हटलं की डोळ्यांसमोर उभे राहतात ते बड्या गाड्यांचे ताफे, कोट्यवधींची उधळपट्टी आणि पैशांचा पाऊस. निवडणूक ही आता केवळ धनदांडग्यांचीच मक्तेदारी उरली आहे का, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात असतानाच, कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 16अ मधील निकालाने या समजाला जोरदार छेद दिला आहे. कोणतीही भक्कम आर्थिक रसद नसताना, केवळ जनसामान्यांच्या पाठबळावर निलेश खंबायत यांनी मिळवलेला विजय हा खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा आणि ‘माणुसकीचा विजय’ मानला जात आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी निलेश खंबायत यांची परिस्थिती जणू “मोठ्या बळासमोर सामान्य प्रयत्न” अशीच होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या प्रचंड खर्चाच्या कल्पनेने त्यांनी माघार घेण्याचा विचार केला होता. “आपल्याकडे लाखो रुपये नाहीत, मग आपण बलाढ्य उमेदवारांचा सामना कसा करणार?” हा प्रश्न त्यांना सतावत होता. याच वेळी मित्रांनी आणि प्रभागातील नागरिकांनी दिलेला शब्द त्यांच्यासाठी संजीवनी ठरला “तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.” हाच विश्वास त्यांच्या विजयाचा पाया ठरला.

हेही वाचा: Chhatrapati Smabhajinagar: मतदान केंद्रावरील पोलिसांशी धक्काबुक्की पडली महागात; माजी महापौरांवर गुन्हा दाखल

या निवडणुकीत खऱ्या अर्थाने लोकांसाठी लढायचं म्हणून लोकांनीच साथ दिली हे चित्र दिसून आलं. खंबायत यांची आर्थिक अडचण पाहून स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेतला. “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावला आणि पाहता पाहता 50,000 रुपयांची वर्गणी जमा झाली. या तुटपुंज्या रकमेतून प्रचारासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले. इतकंच नव्हे, तर पैशांपेक्षा महत्त्वाची ठरली ती जनशक्ती. प्रभागातील नागरिक स्वतःहून प्रचारात उतरले, घरोघरी जाऊन प्रचार केला आणि जनशक्ती ही धनशक्तीपेक्षा कितीतरी मोठी असते हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले.

मतदानाच्या दिवशी एकूण 11,797 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीसोबत उत्सुकता आणि धाकधूक वाढत होती. अखेर ही अटीतटीची लढत एका थरारक निकालावर येऊन थांबली. निलेश खंबायत यांनी आपली प्रतिस्पर्धी उमेदवार श्वेता जाधव यांचा अवघ्या सहा मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला. केवळ सहा मतांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या संघर्षाला विजयाची किनार मिळाली. निकाल जाहीर होताच कल्याण परिसरात जल्लोष झाला आणि “सामान्यांचा माणूस” अखेर सभागृहात पोहोचल्याचा आनंद साजरा करण्यात आला.

विजयानंतर अत्यंत भावूक होत निलेश खंबायत यांनी प्रतिक्रिया दिली. “हा विजय माझा नाही. ज्या मतदारांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे माझ्यासाठी खर्च केले, माझ्यावर विश्वास दाखवला, हा विजय त्या जनतेचा आहे,” असे ते म्हणाले. राजकारणात केवळ पैसा आणि सत्ता हाच यशाचा मार्ग नसतो; लोकांप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विश्वास असेल, तर सामान्य कार्यकर्ताही गगनाला गवसणी घालू शकतो, हे या निकालाने अधोरेखित झाले आहे. निलेश खंबायत यांचा हा विजय भविष्यातील राजकीय कार्यकर्त्यांसाठी नक्कीच एक दीपस्तंभ ठरणार आहे.

हेही वाचा: Mumbai Congress Party: काँग्रेसमध्ये पराभवाचे 'पोस्टमॉर्टम' सुरू होण्यापूर्वीच संघर्षाचा 'धूर'; पक्षाने बड्या नेत्यांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस


सम्बन्धित सामग्री