छत्रपती संभाजीनगर: लोकशाहीच्या उत्सवात शिस्तीला महत्त्व असते, मात्र याच शिस्तीचा भंग झाल्याने छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी (16 जानेवारी) मोठे रणकंदन पाहायला मिळाले. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट पोलिसांशी धक्काबुक्की आणि वादात झाले. याप्रकरणी माजी महापौर विकास जैन यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांवर वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहराच्या राजकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी नऊ ते साडे नऊच्या सुमारास प्रभाग क्रमांक 18 ते 22 आणि 27 ची मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, केवळ वैध ओळखपत्र असलेल्या उमेदवार आणि प्रतिनिधींनाच आत सोडण्याचे कडक आदेश असताना, माजी महापौर विकास जैन, शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल यांनी विनाओळखपत्र आत शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवून ओळखपत्राची मागणी केली यावरून वादाची ठिणगी पडली.
हेही वाचा: BJP Raj K Purohit Passes Away : भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन
पोलीस निरीक्षक सागर शिलवंत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर बॅरिकेटिंग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक प्रमोद कठाणे आणि सहायक निरीक्षक मिरधे यांना धक्काबुक्की करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या गोंधळात माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक सागर देशमुख स्वतः बंदोबस्ताचे नेतृत्व करत असताना ही घटना घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे की, वारंवार विनंती करूनही आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणला आणि पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी आता भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये शासकीय कामात अडथळा, मनाई आदेशाचे उल्लंघन आणि पोलिसांवरील हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकीकडे माजी महापौरांच्या समर्थकांनी पोलिसांवर विनाकारण मारहाण केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने 'कायदा सर्वांसाठी समान आहे' अशी कठोर भूमिका घेतली आहे. वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आगामी काळात या प्रकरणाला कोणते राजकीय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्रावरील हा राडा शहरात चर्चेचा विषय ठरला असून राजकीय नेत्यांच्या अशा वर्तणुकीवर सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: Solapur Political Update: भाजपला रोखण्यासाठी 'एकच चिन्ह, एकच ध्येय'; महापालिका निवडणुकांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची 'दिलजमाई'