Sunday, December 14, 2025 07:37:00 AM

Priyanka Chopra: सहा वर्षांनंतर ‘देसी गर्ल’चा धमाकेदार कमबॅक!; राजामौलींच्या चित्रपटात झळकणार ‘मंदाकिनी’च्या भूमिकेत

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रियंका चोप्रा पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन करतेय.

priyanka chopra सहा वर्षांनंतर ‘देसी गर्ल’चा धमाकेदार कमबॅक राजामौलींच्या चित्रपटात झळकणार ‘मंदाकिनी’च्या भूमिकेत

Priyanka Chopra: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा तब्बल सहा वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. ‘बाहुबली’ आणि ‘RRR’सारखे भव्य चित्रपट देणारे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आगामी ‘ग्लोबट्रॉटर’ (SSMB 29) या चित्रपटातून प्रियांकाचं पुनरागमन होणार आहे. या चित्रपटात ती ‘मंदाकिनी’ नावाच्या खास व्यक्तिरेखेत दिसणार असून तिचा पहिला लूक बुधवारी सोशल मीडियावर झळकला.

राजामौलींनी स्वतः प्रियांकाचा लूक शेअर करत लिहिलं, “The woman who redefined Indian Cinema on the global stage. Welcome back, Desi Girl! Can’t wait for the world to witness your myriad shades of Mandakini.” म्हणजेच “जगभर भारतीय चित्रपटसृष्टीला नवा ओळख देणाऱ्या या अभिनेत्रीचं पुन्हा स्वागत!” या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव केला.

प्रियांकानेदेखील आपला पोस्टर शेअर करत लिहिलं, “She’s more than what meets the eye… say hello to Mandakini.” तिच्या पोस्टरमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत असली, तरी पारंपारिक नायिकेच्या चौकटीबाहेर जाऊन ती क्लिफवर उभी राहून बंदुकीने गोळी झाडताना दिसते. या एका पोस्टरमधूनच ‘मंदाकिनी’ ही व्यक्तिरेखा किती दमदार आणि अनपेक्षित असणार आहे याची झलक मिळते.

चित्रपटाचा नायक महेश बाबू यानेदेखील प्रियांकाचा लूक शेअर करत लिहिलं, “And now she arrives… Meet Mandakini @priyankachopra.” त्याचबरोबर चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना या जोडीला “बॉक्स ऑफिस सुनामी” म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं, “@priyankachopra in @ssrajamouli’s world? Saree slaying with a gun this is epic!”


 

‘ग्लोबट्रॉटर’ हा राजामौलींचा पुढचा मोठा प्रोजेक्ट असून, त्याबद्दल फारशी माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र, या चित्रपटात महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे तीन मोठे कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, पृथ्वीराज याची ‘कुंभा’ ही खलनायकाची भूमिका काही दिवसांपूर्वी उघड करण्यात आली होती.

चित्रपटाशी संबंधित मोठं इव्हेंट 15 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीत होणार असून, त्या दिवशी चित्रपटाचं अधिकृत शीर्षक जाहीर होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर करण्यात येणार आहे.

प्रियांकाने मागील काही वर्षांपासून हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’सारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सनंतर आता ती पुन्हा भारतीय प्रेक्षकांसमोर येणार आहे. राजामौलींसारख्या दिग्दर्शकाशी तिचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

चित्रपटाचा पहिला लूक पाहता स्पष्ट होतंय की, ही फक्त एक अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर कथा नसून, भारतीय सिनेमाची नवी ओळख ठरणार आहे. राजामौलींच्या सिनेमांप्रमाणे यात भव्यता, कथा आणि पात्रांचा सखोलपणा दिसणार यात शंका नाही.


सम्बन्धित सामग्री