Tamil Brahmi inscriptions : प्राचीन भारताच्या सागरी पराक्रमाचा आणि जागतिक व्यापाराचा एक अत्यंत विस्मयकारक पुरावा इजिप्तच्या भूमीतून समोर आला आहे. इजिप्तमधील सुप्रसिद्ध 'व्हॅली ऑफ द किंग्स' (Valley of the Kings) येथे संशोधकांना 2,000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत. या शोधामुळे भारतीय, विशेषतः तमिळ व्यापाऱ्यांचा राबता केवळ बंदरांपुरता मर्यादित नसून, ते इजिप्तच्या अंतर्भागापर्यंत पोहोचले होते, हे सिद्ध झाले आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेत ऐतिहासिक उलगडा
तमिळनाडू राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय तमिळ शिलालेख परिषदेत 11 फेब्रुवारी 2026 रोजी हा शोध सादर करण्यात आला. स्वित्झर्लंडमधील लॉझान विद्यापीठाचे प्रा. इंगो स्ट्रॉख आणि पॅरिसचे प्रा. शार्लोट श्मिड यांनी संयुक्त संशोधनाद्वारे सहा दगडी कबरींमध्ये एकूण 30 शिलालेख शोधले आहेत. यात 20 शिलालेख तमिळ भाषेत असून उर्वरित संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्ठी लिपीत आहेत.
'सिकै कोर्रन': पहिला भारतीय पर्यटक?
या संशोधनातील सर्वात रोचक बाब म्हणजे 'Cikai Korran' (सिकै कोर्रन) हे नाव. संशोधकांना हे नाव चक्क 8 वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहे. एका शिलालेखावर 'Cikai Korran vara kanta' असे लिहिले आहे, ज्याचा अर्थ 'सिकै कोर्रन आला आणि त्याने पाहिले' असा होतो. आजच्या काळात पर्यटक जसे ऐतिहासिक वास्तूंवर आपली नावे कोरतात, अगदी तशाच 'टुरिस्ट ग्राफिटी' शैलीत हा मजकूर कोरला आहे. 'सिकै' म्हणजे मुकुट आणि 'कोर्रन' म्हणजे नेता, यावरून ही व्यक्ती एखादा मोठा व्यापारी नेता असावा, असा अंदाज आहे. यावरून 'सिकै कोर्रन' नावाच्या भारतीय पर्यटकाने इतिहास कोरला होता, असाही एक अंदाज लावला जात आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या दूतांचेही दर्शन
केवळ तमिळच नव्हे, तर पश्चिम भारतातील लोकांचेही अस्तित्व येथे दिसून आले आहे. एका संस्कृत शिलालेखात पहिल्या शतकातील (इ.स.) 'क्षहरात' वंशाच्या एका दूताचा उल्लेख आहे. यावरून स्पष्ट होते की, प्राचीन काळात महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर-पश्चिम भारतातील लोकही इजिप्तच्या राजघराण्यांशी संवाद साधत होते. आतापर्यंतची ही धारणा की केवळ रोमन व्यापारी भारतात येत होते, या शोधामुळे मोडीत निघाली आहे.
व्यापारी संघटनांचे जागतिक जाळे
प्रा. स्ट्रॉख यांच्या मते, इजिप्तमधील ही उपस्थिती केवळ बंदरांपुरती (उदा. बेरेनाईक) मर्यादित नव्हती. भारतीय व्यापारी दीर्घकाळ इजिप्तमध्ये वास्तव्यास होते आणि त्यांनी किनाऱ्यापासून दूर असलेल्या ऐतिहासिक स्थळांनाही भेटी दिल्या होत्या. हे शिलालेख समाजाचा कालानुक्रमिक आणि विश्वासार्ह इतिहास सांगतात, कारण साहित्यिक लिखाणासारखी त्यात नंतरच्या काळात भेसळ करता येत नाही, असे तमिळनाडूचे पुरातत्त्व मंत्री थंगम तेन्नरसु यांनी सांगितले.
हेही वाचा – जगाला निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या चीनचा रस्ताही निघाला 'चायनामेड'; पाहा कसा झाला गायब, CCTV फुटेज व्हायरल