तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी; दिल्ली कोर्टाचा निर्णय

26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला एनआयए कोठडी; पुढील 12 दिवस मुख्यालयात चौकशी होणार.

तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी; दिल्ली कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली :26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी एनआयएने तहव्वूर राणाला दिल्लीतील विशेष कोर्टात हजर केलं आणि तपासासाठी 12 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एनआयएच्या युक्तिवादावर विश्वास दाखवत ही मागणी मान्य केली आहे. राणाला आता पुढील 12 दिवस एनआयएच्या मुख्य कार्यालयात ठेवून चौकशी केली जाणार आहे.

एनआयएच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ दायम कृष्णन यांनी पटियाला हाउस कोर्टात युक्तिवाद सादर केला. एनआयएने सांगितलं की, तहव्वूर राणा तपासात सहकार्य करत नाही आहे आणि त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घ काळासाठी कोठडीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष न्यायाधीश चंद्रजीत सिंग यांनी सुरुवातीला निर्णय राखून ठेवला होता. मात्र संध्याकाळी झालेल्या सुनावणीत त्यांनी राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.

हेही वाचा: भेकडया पाकिस्तानला चीनचा आधार; दहशतवादी हल्ल्यावर निष्पक्ष चौकशीची मागणी

तहव्वूर राणा याला सोमवारी कडेकोट बंदोबस्तात कोर्टात आणण्यात आलं होतं. कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राणा हा 26/11 च्या भीषण मुंबई हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार मानला जातो. त्याच्या अटकेनंतर त्याच्यावर भारतात आणखी तपास सुरु असून, त्याच्या चौकशीतून काही मोठे गुपित उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, राणाच्या चौकशीतून 26/11 हल्ल्याच्या पूर्वतयारी, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेले संबंध आणि हल्ल्यासाठी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला 12 दिवस तपास यंत्रणेकडे ठेवणं अत्यावश्यक होतं.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या या भयानक दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले होते आणि शेकडो लोक जखमी झाले होते. यासाठी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचे सदस्य जबाबदार ठरवले गेले आहेत. तहव्वूर राणा याचे नाव या षड्यंत्रात अगदी सुरुवातीपासूनच समोर आले आहे.

तहव्वूर राणाच्या कोठडीमुळे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातून या कारवाईचं स्वागत होत आहे, तर तपास यंत्रणांवर आता आणखी जबाबदारी वाढली आहे की या ऐतिहासिक प्रकरणात न्याय मिळवून द्यावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number