नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीनकडे पाठिंब्याची याचना केली आणि चीननेही नेहमीप्रमाणे आपल्या जवळच्या मित्रदेशाला साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानी समकक्ष इशाक दार यांच्याशी फोनवरून संवाद साधताना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी गट द रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील आधीच तणावपूर्ण असलेल्या संबंधांमध्ये आणखी कटुता निर्माण झाली आहे.
हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलली असून पाकिस्तानविरुद्ध आर्थिक आणि कूटनीतिक दबाव वाढवण्याचे ठरवले आहे. सिंधू जल करार निलंबित करणे आणि अटारी सीमेवरील एकमेव कार्यरत जमीन सीमा क्रॉसिंग बंद करणे यासारखे निर्णय भारताने घेतले आहेत. भारताच्या या निर्णयांवर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली असून नदीचे पाणी रोखण्याचा निर्णय युद्धाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची आणि सर्व प्रकारचा व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे.
हेही वाचा: भारत न सोडणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास?, पहलगाम हल्ल्यानंतर पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश
चीनने मात्र या संपूर्ण परिस्थितीत पाकिस्तानला पाठिंबा देताना संयम आणि संवादाचे आवाहन केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, चीन या संपूर्ण घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहे. आम्ही सर्व संबंधित पक्षांनी संयम राखावा अशी अपेक्षा करतो आणि या दहशतवादी घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी अशी आमची भूमिका आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढण्याचे सगळे देश सातत्याने बोलतात, मात्र प्रत्यक्षात पाकिस्तानसारख्या देशाला समर्थन देणाऱ्या चीनच्या भूमिकेमुळे दहशतवादाच्या विरोधातील जागतिक लढ्याला मार बसतो, अशी टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले असून आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या भूमिकेबाबत जागरूक करण्यासाठी नवे प्रयत्न सुरू झाले आहेत. पहलगाम हल्ल्याचे सखोल तपशील आणि पाकिस्तानच्या सहभागाबद्दलच्या पुराव्यांसह भारत विविध मंचांवर आपली बाजू मांडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.