तब्बल 13 लाख फॉलोअर्स असलेल्या 27 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं उचललं टोकाचं पाऊल! वडिलांनी दिली धक्कादायक माहिती

एका भाड्याच्या विलामध्ये राहणारा 27 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्ही. हरीश याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण डिजिटल विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
influencer
influencer

V Harish Influencer Ends His Life: एका भाड्याच्या विलामध्ये राहणारा 27 वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्ही. हरीश याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण डिजिटल विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हरीश फायनान्स आणि गुंतवणुकीशी संबंधित विषयांवर गेल्या 5 वर्षांपासून कंटेट बनवत होता. त्याचे सोशल मीडियावर तब्बल 1.3 दशलक्ष म्हणजेच 13 लाख फॉलोअर्स होते. या दुर्दैवी घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी एका प्रतिस्पर्धी इन्फ्लुएन्सरवर गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. चेन्नईच्या मट्टुकाडु भागात ही घटना घडली आहे.

सायबर बुलिंग आणि सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक होण्याचे सत्र
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरीशच्या व्यावसायिक आयुष्यात गेल्या काही काळापासून मोठा तणाव निर्माण झाला होता. या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ. सप्टेंबर महिन्यात हरीशचे मुख्य ऑनलाइन चॅनेल मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट केले गेल्यामुळे ब्लॉक करण्यात आले होते. त्याचे दुसरे सोशल मीडिया अकाउंट देखील नंतर ब्लॉक झाले, आणि त्याने नव्याने सुरू केलेले चॅनेल देखील विरोधकांकडून रिपोर्ट करून बंद पाडण्यात आले. मृत्यूपूर्वी हरीशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्याने सायबर बुलिंग आणि अकाउंट्स बंद पाडण्याच्या धमक्यांना कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – संतापजनक घटना! दांडिया खेळताना झालेल्या वादातून मित्राचा जीव घेतला; 8 वर्षांच्या मैत्रीचा थरकाप उडवणारा अंत

वडिलांचे गंभीर आरोप आणि जेसन सॅम्युअलचे स्पष्टीकरण
हरीशचे वडील जे. विनायगम यांनी स्थानिक पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, जेसन सॅम्युअल नावाच्या दुसऱ्या एका इन्फ्लुएन्सरने हरीशला सतत सायबर बुलिंगचा शिकार बनवले, त्याच्याविरुद्ध मानहानीकारक पोस्ट केल्या आणि धमक्या दिल्या. 18 ऑक्टोबर रोजी सॅम्युअलने काही व्हिडिओ शेअर करून हरीश लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, सॅम्युअलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हरीशकडे सेबीचा (SEBI) परवाना नसताना तो वित्तीय सल्ला देत असल्याचा प्रश्न आपण उपस्थित केला होता, असा दावा सॅम्युअलने केला आहे. तसेच, हरीश टोकाचे पाऊल उचलेल याचा आपण विचारही केला नसल्याचे त्याने म्हटले आहे.

पोलिसांचा तपास आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी

सध्या कनाथूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृताच्या वडिलांनी पोलिसांनी मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ गांभीर्याने तपासावा, सर्व डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावे आणि अकाउंट्स ब्लॉक होण्यामागच्या कारणाचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. दोन्ही बाजूंच्या जबाबांची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा – प्रेयसीला दुसऱ्यासोबत गरबा खेळताना पाहिल्यानंतर तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबियांकडून प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version