Stray Dog Attack : उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. हजरतनगर गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटा गावात 10 ते 12 भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका 9 वर्षांच्या मुलीवर रानटी हल्ला करून तिला ठार केले. रिया गौतम असे या मृत मुलीचे नाव असून, ती स्थानिक प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. ही भीषण घटना रविवारी सायंकाळी घडली, जेव्हा रिया आपल्या आई आणि आजीसोबत शेतात चारा गोळा करण्यासाठी जात होती.
हेही वाचा - India Pakistan Relation: रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते, मग भारतीय सैन्याने असं काही केलं की...
हात तोडला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, रियाची आई ममता आणि आजी मुन्नी या थोड्या पुढे चालत होत्या आणि रिया त्यांच्या मागे होती. अचानक 10 ते 12 कुत्र्यांच्या टोळीने रियावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी तिला इतक्या क्रूरपणे लचके तोडले की, ओरड ऐकून तिची आई आणि आजी घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिचा एक हात शरीरापासून वेगळा करून कुत्र्यांनी तिला ओढून नेले होते. ग्रामस्थांनी धाव घेऊन कुत्र्यांना हाकलले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रियाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा - Love Tragedy: भरधाव ट्रेन, आरडाओरडा अन् क्षणात सर्वकाही संपलं... वंदे भारतसमोर झोकून देत प्रेमीयुगुलांनी उचललं टोकाचं पाऊल
या घटनेतील क्रूरता इतकी भयानक होती की, बराच वेळ शोध घेऊनही रियाचा कापलेला हात परिसरात सापडला नाही. या घटनेमुळे संपूर्ण पोटा गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.