मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या आंदोलनात अभिनेता इम्रान खान मुंबईत सहभागी झाला होता. परिणामी, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे त्याला आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. तसेच, 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याची नोटीसही त्याला पाठवण्यात आली होती.
मात्र, या नोटिशीविरोधात इम्रानने हायकोर्टात धाव घेतली. आज, 2 नोव्हेंबर 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी भारत सोडण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या इम्रान खानला कोर्टाने सुनावले.
इम्रान खानच्या वकिलांनी काय बाजू मांडली?
इम्रान खानच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, “मी 42 वर्षांपासून भारतात राहत आहे. आंदोलन करणाऱ्या संघटनेशी आमचा कोणताही संबंध नाही.”
कोर्टाने काय म्हटले?
यावर कोर्टाने विचारले, “तुमचा संबंध नाही, असे म्हणत आहात. पण तुम्ही तिथे होता. तुमची फिल्म रिलीज होतेय का? प्रमोशनसाठी गेला होतात का? तुम्ही कुणासोबत होतात? तुम्ही आंदोलनात सहभागी झाला होता की फक्त त्या भागात उपस्थित होता? हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल.”
याचबरोबर, इम्रान खानने दिलेली वक्तव्ये दिशाभूल करणारी असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. OCI कार्डधारकांना आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी कोर्टात सांगितले.
“तुम्ही 42 वर्षांपासून भारतात राहत आहात. आतापर्यंत कुणी काही बोलले नाही. मात्र, आता ही घटना घडल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही OCI कार्डधारक आहात. तुम्हाला आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही,” असे सरकारी वकिलांनी मांडले. OCI कार्डसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तुम्ही भारतीय नागरिक नाही, तुमच्याकडे OCI कार्ड आहे आणि त्यामुळे तुम्हाला आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
"तुम्ही जन्मापासून इथे आहात, इथे काम करता, कमावता आणि राहता, मग भारतीय नागरिक का होत नाही?" असा सवालही कोर्टाने केला. "एखाद्या भारतीय नागरिकाने अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशात असे केले असते, तर चालले असते का? अमेरिकेत असे केले असते, तर त्याला दुसऱ्या विमानाने भारतात पाठवले असते," अशा शब्दांत न्यायाधीशांनी इम्रान खानला सुनावले. तसेच, केवळ हमीपत्र देऊन चालणार नाही, तर इम्रान खानने माफी मागावी, असे निर्देशही कोर्टाने दिले.
OCI कार्ड म्हणजे काय?
OCI कार्ड (Overseas Citizen of India) हे परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारत सरकारकडून दिले जाणारे विशेष कार्ड आहे. मात्र, OCI कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नव्हे. हे परदेशी नागरिकांना भारतात राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी दिले जाणारे आजीवन व्हिसासदृश (Lifelong Visa) विशेषाधिकार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-