महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अंतर्गत घडामोडींना अचानक तीव्र वेग आला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्ली भेटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची एक तातडीची बैठक उद्या मुंबईत बोलावली आहे. तब्बल 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, यात काही मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीतील गुप्त भेटीमागील नाराजी आणि राजकीय चर्चेला उधाण
या संपूर्ण राजकीय हालचालींची सुरुवात रविवारी रात्री घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेपासून झाली. राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. पक्षातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याची खंत या नेत्यांनी शाह यांच्यासमवेत व्यक्त केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबतही आपली नाराजी बोलून दाखवण्यात आली. तसेच, महायुती सरकारमधील अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्याबाबतही या नेत्यांनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता होणार महत्त्वाची बैठक
दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर मुंबईतही हालचाली तीव्र झाल्या आहेत. आज पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत असतानाच, सुनेत्रा पवार यांनी उद्या मुंबईतील अधिकृत ‘देवगिरी’ निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मागील 4 महिन्यांत आमदारांची एकत्रित बैठक झाली नसल्याने, या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षातील वाढती अंतर्गत अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि आमदारांशी थेट संवाद साधण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ही धावपळ केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – शरद पवारांची तब्येत आता कशी? सुनेत्रा पवारांनी स्वतः दिली हेल्थ अपडेट, म्हणाल्या ‘बाबांना…
आमदार बैठकीत कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
एकंदरीतच, एका बाजूला ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीवारी आणि नाराजीच्या चर्चा, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांनी बोलावलेली आमदारांची ही आपत्कालीन बैठक यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीत पक्षांतर्गत समनव्य साधण्यासोबतच आगामी रणनीती आणि काही महत्त्वाच्या राजकीय निर्णयांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.