पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. खोकल्याचा त्रास आणि छातीत दुखत असल्याची तक्रार जाणवल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीची माहिती
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळातून आणि कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. खोकल्याचा त्रास झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, आरोग्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे निकष स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable. Thank you all for your concern and good wishes. — Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2026
डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार
रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ आणि अध्यक्ष डॉ. पुरवेझ ग्रँट यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर त्यांना तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती लवकरच सुधारेल, अशी अपेक्षाही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळी भागांच्या दौऱ्यानंतर प्रकृती अस्वस्थ
शरद पवार अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला होता. सततचे दौरे आणि प्रवास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update