Sunday, July 13, 2025 09:48:55 AM

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ शूट करणारा युवक आर्यन पोलिसांच्या चौकशीत; कोणताही दहशतवादी हेतू नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष, सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ.

ahmedabad plane crash अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातानंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून जात असल्याचे आणि नंतर कोसळतानाचे भयावह दृश्य स्पष्टपणे दिसत होते. हा व्हिडीओ इतक्या अचूक वेळेस आणि कोनातून कसा काय रेकॉर्ड झाला, यावरून नागरिकांमध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या. आता सदर व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या युवकाचे नाव आर्यन असून तो मूळचा अहमदाबादचा रहिवासी नसून गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी काही दिवसांपूर्वी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने हा व्हिडीओ अगदी सहजपणे, उत्सुकतेपोटी रेकॉर्ड केला होता. त्याचा कोणताही दहशतवादी किंवा संशयास्पद हेतू नव्हता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, इतक्या अचूक वेळेस आणि जवळून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओमुळे अधिक तपास करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: उल्हासनगरात जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्याची धक्कादायक घटना; वैद्यकीय क्षेत्राचा हलगर्जीपणा

आर्यनच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आर्यनला लहानपणापासूनच आकाशात उडणाऱ्या विमानांचे फार आकर्षण आहे. तो नेहमी म्हणत असे की, 'मी एक दिवस विमानात बसेन.' गावात राहणाऱ्या आर्यनसाठी शहरात विमान उडताना पाहणे हेच एक अद्भुत दृश्य होते. अपघाताच्या दिवशी देखील तो केवळ विमान उडताना पाहण्यासाठी रेकॉर्डिंग करत होता. मात्र काही क्षणांतच विमान कोसळले आणि आर्यनने भीतीपोटी रेकॉर्डिंग थांबवले.

आर्यनने पोलीस चौकशीदरम्यान सांगितले की, विमान इतक्या जवळून जात होते की तो आश्चर्यचकित झाला होता. तो फक्त आपल्या गावातील मित्रांना हे दृश्य दाखवण्यासाठी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. त्याचा या अपघाताशी कोणताही थेट संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: गोंदिया शासकीय आश्रम शाळेतील नर्स भरतीत मोठा घोटाळा; स्थानिक उमेदवारांचा आरोप

आर्यनच्या शेजाऱ्यांनी देखील त्याच्या बाजूने बोलताना सांगितले की, तो पूर्णपणे निरपराध आहे. गावावरून आलेल्या आर्यनसाठी ही गोष्ट नवीन होती आणि त्यातूनच त्याने व्हिडीओ बनवला. तेव्हाच अचानक स्फोट झाला आणि परिसरात काळ्या धुराचे लोट उठले.

सध्या पोलीस प्रशासन आर्यनच्या मोबाइलमधील व्हिडीओ आणि स्थानिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे. व्हिडीओमधून अपघाताचा अचूक घटनाक्रम समजण्यासाठी मदत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आर्यनला लवकरच मुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे, कारण त्याच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती समोर आलेली नाही.


सम्बन्धित सामग्री