गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळांमध्ये नर्स पदासाठी बाह्यस्त्रोताद्वारे करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक उमेदवारांनी केला आहे. त्यांनी भरती प्रक्रियेमध्ये पैशांची मागणी करण्यात आली होती, आणि पैसे न दिल्यामुळे त्यांच्या नावांची यादीतून कट करण्यात आल्याचा दावा केला आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण 16 शासकीय आश्रम शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने या शाळांमध्ये नर्स पदभरतीची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया एकात्मिक बाल विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत बाह्यस्त्रोताद्वारे पार पडली. मात्र, या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप आता उमेदवारांकडून केला जात आहे.
स्थानिक उमेदवार संगम रामटेके यांनी सांगितले की, 'माझ्या बहिणीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. तिचे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि सर्व कागदपत्रे योग्य असूनही, पैसे न दिल्यामुळे यादीतून तिचे नाव काढण्यात आले.' संगम यांनी यासंबंधीचा प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्यासोबत झालेला व्हॉइस रेकॉर्ड देखील पुरावा म्हणून सादर केला आहे.
या प्रकारामुळे स्थानिक स्तरावर नाराजीचे वातावरण आहे. अनेक उमेदवारांनी पैसे देणाऱ्या बाहेरील उमेदवारांचीच निवड झाल्याचा आरोप करत, यासंदर्भात तक्रारी प्रकल्प अधिकारी देवरी आणि अन्य अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. यावर प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "ही संपूर्ण प्रक्रिया बाह्यस्त्रोताद्वारे करण्यात आली आहे. जर या भरती प्रक्रियेमध्ये कोणताही घोळ झाला असेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती देण्यात येईल आणि चौकशीची मागणी करण्यात येईल.'
स्थानिक उमेदवारांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. निव्वळ आर्थिक देवाण-घेवाण करून पात्र उमेदवारांना डावलले जात असेल, तर अशा घटना शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना काळिमा फासणाऱ्या ठरतात.