Bharat Vistaar AI For Farmers: भारतीय कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने भारत विस्तार (Bharat Vistar) नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मंगळवारी जयपूर येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्लॅटफॉर्म प्रगत AI (Artificial Intelligence) चा वापर करून शेतकरी, वैज्ञानिक संस्था आणि सरकारी यंत्रणांना एकाच डिजिटल नेटवर्कवर जोडण्याचे काम करणार आहे.
काय आहे 'भारत विस्तार' प्रणाली?
'भारत विस्तार' हे एक त्रिस्तरीय डिजिटल नेटवर्क आहे जे DPI (Digital Public Infrastructure) म्हणून कार्य करेल. या प्रणालीचे तीन मुख्य भाग आहेत:
मागणी बाजू (Demand Side): शेतकरी मोबाइल, वेब किंवा हेल्पडेस्कद्वारे त्यांच्या स्थानिक भाषेत माहिती मिळवू शकतील.
नेटवर्क लेयर (Network Layer): केंद्र आणि राज्य स्तरावरील माहितीचे सुरक्षित वहन आणि AI आधारित विश्लेषण येथे केले जाईल.
पुरवठा बाजू (Supply Side): कृषी संशोधन संस्था, हवामान विभाग (IMD) आणि बाजारभाव पोर्टल याद्वारे अचूक डेटा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल.
शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे
या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना आता पीक सल्ला, अचूक हवामान अंदाज आणि रिअल-टाइम बाजारभाव मिळवणे सोपे होणार आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत व्हॉइस-आधारित सेवा मिळतील. तसेच विविध सरकारी योजनांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची गरज उरणार नाही. पीक रोग आणि हवामानातील बदलांची पूर्वसूचना मिळाल्याने शेतीतील नुकसान कमी होईल. तथापी, तज्ज्ञांच्या थेट सल्ल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होईल.
हेही वाचा - 8th Pay Commission : होळीपूर्वीच खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार?
सहकार्यातून कृषी विकास
भारत विस्तारचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आहे, असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. हे नेटवर्क विकसित करण्यासाठी 600 हून अधिक स्टार्टअप्स आणि विविध राज्य सरकारांची मदत घेतली जात आहे. या प्लॅटफॉर्मशी जोडलेले कोणतेही अधिकृत अॅप शेतकऱ्यांना आवश्यक माहिती पुरवू शकेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील तांत्रिक दरी भरून निघण्यास मदत होईल.