अहमदाबाद: शहरातील मेघानीनगर परिसरात गुरुवारी घडलेली एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 ची भीषण दुर्घटना संपूर्ण देशाला हादरवणारी ठरली. लंडनकडे जाणाऱ्या या विमानात 230 प्रवासी व 12 क्रू मेंबर्स होते. दुर्घटनेची तीव्रता इतकी होती की विमान कोसळताच परिसरात आगीचे लोट उठले आणि अनेक नागरिक, रुग्णालयातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
या दुर्घटनेत चमत्कारिकरित्या वाचलेले एकमेव प्रवासी म्हणजे विश्वशकुमार रमेश (वय 40). ते विमानातील 11-A या सीटवर बसले होते. गुजरात पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी माहिती दिली की, अपघातानंतर घटनास्थळी शोधमोहिम राबवली असता रमेश यांना जिवंत सापडले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर रुग्णवाहिकेत नेत असताना विश्वशकुमार रमेश यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदांत मोठा आवाज झाला आणि सर्व काही थरथरायला लागलं. विमान खालच्या दिशेने जोरात झेपावलं आणि मोठा धडका बसून अपघात झाला. हे सगळं काही क्षणभरात घडलं.' अपघातात रमेश यांच्या छातीला, डोळ्यांना आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
हेही वाचा:Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एआय-171 विमान कोसळले, 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती
AI-171 ही फ्लाईट बोईंग कंपनीच्या विमानात होती. या विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच ते अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या होस्टेल व सिव्हिल हॉस्पिटलच्या टीबी विभागावर कोसळले. त्यावेळी होस्टेलमध्ये असणारे विद्यार्थी जेवण करत होते, त्यामुळे त्यांनाही दुखापती झाल्याची माहिती मिळते.
या विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल हे मुंबईचे रहिवासी असून त्यांना तब्बल 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. को-पायलट क्लाइव्ह कुंदर हे त्यांच्यासोबत होते. इतक्या अनुभवी वैमानिकांच्या मार्गदर्शनाखाली असलेलं विमान इतक्या लवकर कोसळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सध्या किती जणांचा मृत्यू झाला याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), अग्निशमन दल, पोलिस आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं आहे.
या अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून, एकच प्रवासी वाचल्याची बातमी कळताच ती अनेकांच्या आशेचा किरण ठरली. विश्वशकुमार रमेश यांचा जीव वाचल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून,त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीवरून दुर्घटनेचे महत्वाचे तपशील उघड होण्याची शक्यता आहे.