नवी दिल्ली: एअर इंडियाने केबिन क्रू सदस्यांसाठी आरोग्य आणि तंदुरुस्ती संदर्भातील नवी धोरणात्मक नियमावली लागू करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित धोरणानुसार, जे कर्मचारी कमी वजनाचे, जादा वजनाचे किंवा स्थूलत्वाने ग्रस्त आढळतील, त्यांना तात्पुरते कामावरून दूर केले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार त्यांच्या वेतनातही कपात केली जाऊ शकते. केबिन क्रू सदस्यांच्या शरीर वस्तुमान निर्देशांकावर (बीएमआय) आधारित मोजमापावर ही तपासणी केली जाणार आहे.
या धोरणानुसार 18 ते 24.9 दरम्यानचा बीएमआय ‘सामान्य’ मानला जाणार असून हीच श्रेणी कंपनीने अपेक्षित किंवा आदर्श श्रेणी म्हणून निश्चित केली आहे. 18 पेक्षा कमी बीएमआय असल्यास त्या व्यक्तीला ‘कमी वजनाचा’ मानले जाईल. मात्र अशा कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी आणि कार्यक्षमतेची चाचणी उत्तीर्ण केल्यास त्यांना काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
तसेच 25 ते 29.9 दरम्यानचा बीएमआय ‘जादा वजन’ या श्रेणीत मोडतो. अशा केबिन क्रू सदस्यांनाही कार्यक्षमतेची चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास त्यांना सेवेत राहण्याची मुभा दिली जाऊ शकते. मात्र बीएमआय 30 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ती अवस्था ‘स्थूलत्व’ म्हणून गणली जाईल आणि ती स्वीकारार्ह मर्यादेत येणार नाही.
हेही वाचा: Fishing Industry: मच्छीमारी व्यवसायाला 'डिझेल'ची झळ; दरवाढीमुळे मासेमारीचे गणित कोलमडले
ही नवी नियमावली 1 मे 2026 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोरणानुसार, एखादा केबिन क्रू सदस्य ‘कमी वजनाचा’ किंवा ‘जादा वजनाचा’ आढळल्यास त्याला तात्पुरते कर्तव्यावरून दूर केले जाईल आणि त्याला कार्यक्षमतेची चाचणी देणे बंधनकारक असेल. जर कर्मचारी ही चाचणी उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरला, तर ती चाचणी पास करेपर्यंत त्याच्या वेतनात कपात केली जाऊ शकते.
दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये स्थूलत्व आढळेल त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई केली जाईल. अशा कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीत स्वीकारार्ह बीएमआय मिळवणे आवश्यक राहील. तसे न झाल्यास त्यांना कर्तव्यावरून दूर ठेवण्याबरोबरच वेतन कपातीसारखी शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते.
सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या एअर इंडियाने गेल्या काही वर्षांत अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहाने या विमान कंपनीचे अधिग्रहण केले होते. ‘केबिन क्रू आरोग्य आणि तंदुरुस्ती अनुपालन धोरण’ सादर करताना कंपनीने स्पष्ट केले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश केबिन क्रू सदस्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योग्य वजन राखण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे हा आहे.
एअर इंडियाने असेही स्पष्ट केले आहे की, सध्या लागू करण्यात येत असलेली ही नियमावली पुढील काळात अधिक कठोर तंदुरुस्ती निकष लागू करण्यापूर्वीची प्राथमिक तयारी आहे. ही नवी धोरणात्मक नियमावली सध्या उड्डाण सेवा देणाऱ्या तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व केबिन क्रू सदस्यांवर लागू केली जाणार आहे.