अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅमेझॉन लवकरच 30,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, अशी माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली. कंपनीच्या एकूण 15.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या लहान असली तरी कॉर्पोरेट क्षेत्रातील जवळपास 10 टक्के कर्मचारी यामध्ये येतात.
खर्च नियंत्रणासाठी आणि व्यवसायिक पुनर्रचनेच्या प्रक्रियेत अॅमेझॉन सातत्याने उपाययोजना करत आहे. 2022 च्या शेवटी 27,000 कर्मचारी कमी केल्यानंतर ही कंपनीतील सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरणार आहे. कोरोना काळात मागणीत झपाट्याने वाढ झाल्याने अनेक विभागांत जादा भरती झाली होती. आता बाजारातील मंदी आणि व्यवसायिक खर्च वाढल्याने कंपनीला कर्मचारी कमी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कंपनीने अनेक विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये डिव्हाईस विभाग, संपर्क विभाग, पॉडकास्टिंग आणि इतर काही तांत्रिक विभागांचा समावेश आहे. नव्याने होणारी कपात अधिक व्यापक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
हेही वाचा: AGTF Arrested Jagga : यूएस-कॅनडा सीमेवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य ताब्यात; बिश्नोई गँगला मोठा धक्का
येत्या मंगळवारपासून म्हणजेच 28 ऑक्टोबरपासून या नव्या कपातीला सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. Human Resources, People Experience and Technology, Devices आणि Services division या विभागांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे औपचारिक सूचना देण्यापूर्वी त्यांच्या विभागप्रमुखांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
व्याप्ती मोठी असली तरी ग्राहक सेवा किंवा लॉजिस्टिक्स विभागातील दैनंदिन कामकाजावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कर्मचारी कपात हा निर्णय कंपनीच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापनाचे मत असल्याचे सांगितले जाते.
अॅमेझॉन ही जगभरात रोजगार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. अशा परिस्थितीत एका वर्षात पुन्हा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची वेळ येणे, हे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आर्थिक अनिश्चितता अधिकच गडद झाल्याचे द्योतक असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा: Diwali Shopping: यंदा दिवाळीत खर्चाचा नवा विक्रम! 42 टक्के लोकांनी क्रेडिट कार्डचा वापर करून केली खरेदी; 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री