आंध्रप्रदेशच्या करनूल जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. कावेरी ट्रॅव्हल्सची प्रवासी बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली, हैदराबादहून बेंगळुरूकडे जाणारी वोल्वो बस एका दुचाकीला धडकली आणि क्षणातच ज्वाळांनी वेढली गेली.
बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते, ज्यामध्ये चालक आणि सहाय्यकाचाही समावेश होता. धडक झाल्यानंतर दुचाकी बसखाली अडकल्याने ठिणगी उडाली आणि बसने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही प्रवाशांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडक्या फोडाव्या लागल्या. जे प्रवासी वेळेत बाहेर पडू शकले, ते सुखरूप आहेत, असे करनूल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले.
या घटनेत आतापर्यंत 15 जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली असून, सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
हेही वाचा: EPFO News: ईपीएफओचे नवे नियम लागू! कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पेन्शन आणि निधी काढणे अधिक सोपे
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते सध्या दुबई दौर्यावर असून, त्यांना या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच जखमींना योग्य वैद्यकीय उपचार आणि मृतांच्या कुटुंबांना सर्व आवश्यक मदत पुरवण्याचे निर्देशही दिले. मुख्यमंत्री नायडू यांनी मृतांचा आकडा वाढू नये म्हणून तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यास सांगितले.
वाई.एस. जगन मोहन रेड्डी यांचाही शोक व्यक्त
माजी मुख्यमंत्री आणि वाईएसआरसीपीचे अध्यक्ष वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं, “हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या या बसमध्ये झालेला स्फोटक आगीनं जीव गमावलेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे.” त्यांनी राज्य सरकारला पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याची आणि जखमींना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली.
स्थानिक प्रशासन सज्ज
अपघातस्थळी पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा सकाळपासूनच कार्यरत आहेत. स्थानिकांनीही बचावकार्यात मदत केली. प्राथमिक माहितीनुसार, बसमधील प्रवाशांमध्ये काही लहान मुले आणि महिला देखील होत्या. घटनास्थळावरून अजूनही काही प्रवाशांची ओळख पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
हा अपघात आंध्र प्रदेशातील गेल्या काही काळातील सर्वात भीषण अपघातांपैकी एक मानला जात आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा: Aircraft Safety: इंडिगो विमानातील आगीच्या घटनेनंतर मोठा निर्णय! DGCA 'या' महत्त्वाच्या उपकरणावर बंदी घालण्याची शक्यता