DGCA to Impose Ban on Power Banks: दिल्ली-दिमापूर इंडिगोच्या विमानात उड्डाणादरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. DGCA कडून विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, रविवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगीची घटना घडली. उड्डाणासाठी टॅक्सी करत असताना एका प्रवाशाच्या पॉवर बँकला आग लागली. सुदैवाने, केबिन क्रूच्या तत्परतेमुळे आग काही सेकंदात विझवण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डीजीसीएचे कठोर पाऊल
या घटनेनंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिलेल्या सूचनांचे पुनरावलोकन सुरू केले आहे. नव्या नियमानुसार, पॉवर बँकचा विमानात वापर मर्यादित किंवा बंद केला जाऊ शकतो. तथापी, जोखीम वाढल्यास पूर्णपणे वाहतूक बंदी लागू होऊ शकते. नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) आणि DGCA दोन्ही एजन्सी या संदर्भात नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहेत.
हेही वाचा -Defence Ministry: 79 हजार कोटींच्या लष्करी प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने तिन्ही सशस्त्र दलांची ताकद वाढणार
इंडिगोचे अधिकृत निवेदन
इंडिगो एअरलाइन्सने सांगितले की, 19 ऑक्टोबर रोजी दिल्ली-दिमापूर फ्लाइट (6E 2107) मध्ये एका प्रवाशाच्या सीटबॅक पॉकेटमध्ये ठेवलेल्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे आग लागली. आमच्या कर्मचाऱ्यांनी मानक प्रक्रिया अवलंबून काही सेकंदांत आग विझवली. इंडिगोने पुढे सांगितले की, सर्व आवश्यक तपासणीनंतर विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
हेही वाचा - Hair Found in Air India Food: एअर इंडियाच्या जेवणात सापडला ‘केस’; एअरलाइनला भरावा लागला 35 हजारांचा दंड
या आठवड्यातच अशाच प्रकारची घटना एअर चायनाच्या विमानात घडली होती. विमानाच्या ओव्हरहेड डब्यात ठेवलेल्या लिथियम बॅटरीला आग लागली, तेव्हा विमान हांग्झोहून सोलकडे जात होते. या घटनांनंतर जगभरात लिथियम बॅटरी आणि पॉवर बँक सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर DGCA पॉवर बँक वाहतूक आणि वापरासाठी नवीन प्रोटोकॉल तयार करण्याची शक्यता आहे.