Jai Anmol Ambani: उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 228.06 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवली आहे. तक्रारीनुसार, अनमोल अंबानी यांच्या गटातील RHFL (Reliance Home Finance Limited) या कंपनीने बँकेच्या मुंबईतील एससीएफ शाखेतून 450 कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा घेतली होती.
बँकेने या कर्जावर आर्थिक शिस्त, विक्री रक्कम बँकेमार्फत वळवणे, हप्ते व व्याज वेळेवर भरणे अशा कठोर अटी लादल्या होत्या. मात्र कंपनी वेळेवर हप्ते न भरल्याने 30 सप्टेंबर 2019 रोजी खाते NPA म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर, ग्रँट थॉर्नटनकडून करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 2016 ते 2019 या कालावधीत घेतलेल्या कर्जाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे उघड झाले. निधी मूळ व्यावसायिक कामांसाठी वापरण्याऐवजी इतर व्यवहारांकडे वळवल्याचे आढळून आले.
हेही वाचा – DPIIT New Draft: भारतातील AI-कॉपीराइट धोरणात मोठे बदल; DPIIT कडून नवा मसुदा जाहीर
अनमोल अंबानीवर गुन्हा दाखल
बँकेच्या मते, कंपनीचे माजी प्रवर्तक आणि संचालकांनी खात्यांमध्ये फेरफार, दस्तऐवजांमध्ये गैरव्यवहार, तसेच निधीचा फसवी वापर करून बँकेला तब्बल 228 कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर सीबीआयने जय अनमोल अंबानी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात निधी कुठे वळवण्यात आला, कोणत्या मार्गाने आर्थिक अनियमितता घडल्या आणि कोणकोण सहभागी आहे? याचा तपास सीबीआय आता जलदगतीने करणार आहे.