Saturday, December 06, 2025 06:06:22 PM

राग पडला महागात! आर्मी ऑफिसरला विमानात 'नो एंट्री', करावा लागणार रेल्वेने प्रवास

अतिरिक्त बॅगेज शुल्कावरून झालेल्या वादात त्यांनी हिंसक वर्तन केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात आली.

राग पडला महागात आर्मी ऑफिसरला विमानात नो एंट्री करावा लागणार रेल्वेने प्रवास

नवी दिल्ली: भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह यांना त्यांच्या चिडचिड्या आणि हिंसक वर्तनाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. श्रीनगर विमानतळावर घडलेल्या गंभीर प्रकारानंतर देशातील पाच प्रमुख एअरलाइन्सने त्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले आहे. या निर्णयामुळे आता ते विमानाने प्रवास करू शकत नाहीत आणि त्यांची सफर फक्त कार किंवा ट्रेनपुरती मर्यादित झाली आहे. ही कारवाई 26 जुलै 2025 रोजी घडलेल्या घटनेनंतर करण्यात आली.

श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या SG 386 या फ्लाइटमध्ये बोर्डिंगदरम्यान लेफ्टनंट कर्नल सिंह यांनी स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर मारहाण केली होती. त्यांच्या दोन कॅबिन बॅगचे वजन मिळून 16 किलो होते, तर परवानगी फक्त सात किलोपर्यंतचीच असते. अतिरिक्त शुल्क भरण्यास त्यांनी नकार दिला आणि जबरदस्ती एयरोब्रिजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. CISF जवानांनी त्यांना थांबवले, पण गेटवर पोहोचताच ते संतापून स्टाफला कानशिलात लगावून, लाथा-बुक्की करू लागले. मारहाणीची हद्द इतकी वाढली की त्यांनी क्यू मॅनेजमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रॉडने स्पाइसजेट स्टाफवर हल्ला केला. या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या दोन हाडांना फ्रॅक्चर झाले आणि तो जवळपास तीन महिने बिछान्यावर होता.

हेही वाचा:  Gujarat Ambulance Fire: गुजरातमध्ये चालत्या रुग्णवाहिकेला आग; नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू

या घटनेचा व्हिडिओ 3 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये संतापाची लाट उसळली. एव्हिएशन सेक्टरमधील सर्व मोठ्या एअरलाइन्स SpiceJet, IndiGo, Air India, Air India Express आणि Akasa Air यांनी एकमताने ठरवले की अशा हिंसक प्रवाशांना विमानप्रवासाची परवानगी देऊ नये. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रसंग साधा वाद नव्हता; कर्मचाऱ्याचा जीवही जाऊ शकला असता.

अतिरिक्त बॅगेज शुल्क हा सर्व एअरलाइन्सचा नियमित नियम आहे, आणि अशा परिस्थितीत प्रवाशाकडून केलेले बर्बर वर्तन कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. या निर्णयामुळे लेफ्टनंट कर्नल सिंह देशातील प्रमुख विमान कंपन्यांकडून कायमस्वरूपी वंचित झाले आहेत. एव्हिएशन इंडस्ट्रीचा ठाम संदेश असा “विमानतळावर हिंसा करणारांना क्षमा नाही.”

हेही वाचा: Aadhaar Update: पालकांनो लक्ष द्या! मुलांचे आधारकार्ड वेळेत अपडेट करा, नाहीतर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल; स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री



ताज्या बातम्या




ताज्या बातम्या