Ban On Cough Syrup: लहान मुलांच्या मृत्यूशी संबंधित खोकल्याच्या सिरपच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेनंतर भारताच्या औषध नियंत्रक संस्था सीडीएससीओ (Central Drugs Standard Control Organisation) ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थेने कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन खोकल्याच्या सिरपचे उत्पादन तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले असून, बाजारातून सर्व बॅच परत मागवण्यात आल्या आहेत. सीडीएससीओने गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) माहिती देत स्पष्ट केले की, या सिरपपैकी कोणतेही उत्पादन भारतातून निर्यात करण्यात आलेले नाही.
WHO कडून चौकशी आणि भारताचे स्पष्टीकरण
डब्ल्यूएचओने काही दिवसांपूर्वी भारताकडून चौकशी केली होती की, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही औषधे इतर देशांमध्ये पाठवली गेली आहेत का? जागतिक आरोग्य संस्थेने 29 सप्टेंबरच्या आठवड्यात आलेल्या माध्यम अहवालांचा संदर्भ देत सांगितले होते की, काही मुलांमध्ये तीव्र मूत्रपिंड निकामी होणे आणि एन्सेफलायटीस सिंड्रोमसारखी लक्षणे आढळली असून त्यांचा संबंध या सिरपशी असू शकतो. सीडीएससीओने आता स्पष्ट केले आहे की, डीईजी (Diethylene Glycol) किंवा ईजी (Ethylene Glycol) या घातक रसायनांमुळे दूषिततेचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. तरीही, सावधगिरी म्हणून सर्व सिरप बाजारातून हटवले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - US Tariff: अमेरिकेकडून भारतासाठी आनंदाची बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ निर्णयावर घेतला यू-टर्न
ड्रग कंट्रोलर जनरलचे निर्देश
या प्रकरणानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना निर्देश दिले आहेत की, औषधी उत्पादनांचे कच्चे माल आणि तयार औषधे बाजारात विकण्यापूर्वी कठोर प्रयोगशाळीय तपासणी करावी. डीसीजीआयने जारी केलेल्या सल्लागारात म्हटले आहे की, काही उत्पादन केंद्रांमध्ये प्रत्येक बॅचची चाचणी न घेता औषधे बाजारात विक्रीसाठी येत आहेत, जे नियमभंग आहे.
हेही वाचा - Nitin Gadkari On Solid Waste: 2027 पर्यंत सर्व घनकचरा रस्ते बांधकामासाठी वापरला जाणार; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मृत्यूंची प्रकरणे
अलीकडेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि राजस्थानातील काही जिल्ह्यांमध्ये दूषित कफ सिरपमुळे अनेक चिमुड्यांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर देशभरात औषध तपासणीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओने भारत सरकारला इशारा दिला आहे की, अशा दूषित औषधांचा अनियंत्रित निर्यात मार्गांद्वारे इतर देशांत प्रसार होऊ नये. यासाठी कडक कारवाई करणे आवश्यक आहे. तथापी, भारताने यावर WHO ला अहवाल सादर केला आहे.