नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) मंगळवारी 14 नोव्हेंबरपासून दोहामध्ये होणाऱ्या रायझिंग स्टार्स एशिया कपसाठी भारत अ संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय या संघाचं नेतृत्व अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जीतेश शर्मा करणार आहे, तर पंजाबचा युवा ऑलराउंडर नमन धीर उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे. जीतेश शर्मा याने गतवर्षी विदर्भ संघाला सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेले होते आणि नुकतंच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेत भारताच्या मुख्य संघात पुनरागमन केलं आहे. त्याच्या अनुभव आणि नेतृत्वगुणांवर निवड समितीने पूर्ण विश्वास दाखवला आहे.
या संघात देशांतर्गत टी20 स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यात प्रियंश आर्या, वैभव सूर्यवंशी, रमणदीप सिंह, अशुतोष शर्मा आणि युधवीर सिंग चारक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा संघातील सर्वात तरुण खेळाडू असून त्याने आयपीएलमधील आपल्या पदार्पणातच 35 चेंडूत शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. भारत अ संघात यंदा पारंपरिक पद्धतीने अंडर-23 खेळाडू निवडले गेले नाहीत. निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत 25 ते 28 वयोगटातील आठ खेळाडू संघात घेतले आहेत. कप्तान जीतेश शर्मा हा या संघातील एकमेव 30 वर्षांपेक्षा जास्त असेलेला सिनिअर खेळाडू आहे.
हेही वाचा: Indian Truck Drivers in America : भारतीय ट्रकचालक अमेरिकेत इंग्रजीच्या परीक्षेत नापास! ट्रम्प प्रशासनाच्या फतव्यामुळे 7 हजार परवाने रद्द
ही स्पर्धा 14 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान दोहामधील वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत अ संघ ग्रुप बी मध्ये असून त्याच गटात यूएई, पाकिस्तान अ आणि ओमान हे संघ आहेत. भारताचे सामने अनुक्रमे 14, 16 आणि 18 नोव्हेंबरला होतील, तर 21 आणि 23 नोव्हेंबरला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी (14 नोव्हेंबर) दोन सामने होतील. एक ओमान आणि पाकिस्तान यांच्यात आणि दुसरा भारत अ आणि यूएई यांच्यात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 16 नोव्हेंबरला (रविवार) खेळवला जाईल.
संघातील मधल्या फळीत अशुतोष शर्मा आणि हर्ष दुबे आक्रमक फलंदाजी आणि फिरकीचा समतोल राखेल. गोलंदाजी विभागात यश ठाकूर, गुरजपनीत सिंग आणि विजय कुमार वैशाख हे वेगवान गोलंदाज तर युधवीर सिंग चारक ऑलराउंडची भूमिका पार पाडेल. सुयश शर्मा, कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये चमकलेला रहस्यमय फिरकीपटू, संघाच्या फिरकी विभागाला धार देईल. भारत अ संघात अभिषेक पोरेल दुसरा यष्टिरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. जीतेश शर्मा याच्या नेतृत्त्वाखालील हा संघ अनुभव, आत्मविश्वास आणि युवा जोश यांचा उत्तम संगम मानला जात आहे.
भारत अ संघ : प्रियंश आर्या, वैभव सूर्यवंशी, नेहाल वढेरा, नमन धीर (उपकर्णधार), सुर्यांश शेडगे, जीतेश शर्मा (कर्णधार), रमणदीप सिंह, हर्ष दुबे, अशुतोष शर्मा, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, विजय कुमार वैशाख, युधवीर सिंग चारक, अभिषेक पोरेल, सुईयश शर्मा.
स्टँडबाय खेळाडू : गुरनूर सिंग ब्रार, कुमार कुशाग्र, तनुश कोटियन, समीअर रिजवी, शेख राशिद
हेही वाचा: DGCA New Policy: फ्लाइट तिकीट रद्दीकरण आता होणार अधिक सोपं; DGCA चा ‘लुक-इन ऑप्शन’ प्रस्ताव चर्चेत