मुंबई: आयपीएल 2026 चा हंगाम आता निम्म्याहून अधिक प्रवास पूर्ण करून निर्णायक टप्प्यावर पोहोचला असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI, Board of Control for Cricket in India) एक अत्यंत कठोर आणि खळबळजनक आदेश जारी केला आहे. लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांसाठी बीसीसीआयने नवीन कडक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जाहीर केली असून, ती केवळ खेळाडूंवरच नाही, तर संघ अधिकारी आणि फ्रँचायझी मालकांवरही तितकीच बंधनकारक असणार आहेत. विशेषतः खेळाडूंना 'हनी-ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा कट रचला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अँटी-करप्शन युनिटचा 'हनी-ट्रॅप'बाबत सतर्कतेचा इशारा
पीटीआयच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या 'अँटी-करप्शन युनिट'ने अज्ञात व्यक्तींच्या संपर्कामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत गंभीर अहवाल सादर केला आहे. या अहवालात खेळाडू आणि अधिकाऱ्यांना 'हनी-ट्रॅप'मध्ये अडकवून संघ किंवा सामन्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सर्व संघांना आठ पानांचे सविस्तर मार्गदर्शक दस्तऐवज पाठवले असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या हंगामात काही खेळाडूंचे जोडीदार, नातेवाईक आणि मित्रांशी संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर बोर्डाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
हॉटेलच्या रूममध्ये एन्ट्रीसाठी आता 'लिखित' परवानगी अनिवार्य
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या नियमावलीनुसार, आता कोणत्याही व्यक्तीला, मग त्याचे खेळाडूशी कोणतेही नाते का असेना, टीम मॅनेजरच्या पूर्वपरवानगीशिवाय खेळाडूच्या किंवा सपोर्ट स्टाफच्या हॉटेल रूममध्ये जाता येणार नाही. खेळाडूंना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांना केवळ हॉटेलची लॉबी किंवा रिसेप्शन लाउंजमध्येच भेटता येईल. जर कोणाला प्रायव्हेट रूमपर्यंत नेण्याची गरज भासली, तर टीम मॅनेजरची लेखी परवानगी असणे बंधनकारक असेल. या नियमामुळे आता हॉटेलमधील खासगी भेटीगाठींवर बोर्डाची करडी नजर राहणार आहे.
हेही वाचा: Actor Death Rumor: 'मी अजून जिवंत आहे'; व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याचा संताप, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा
'टार्गेटेड कॉम्प्रोमाइज' आणि कायदेशीर धोके
बीसीसीआयने पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आयपीएलसारख्या हाय-प्रोफाइल स्पर्धेदरम्यान 'टार्गेटेड कॉम्प्रोमाइज' आणि 'हनी-ट्रॅपिंग'चा धोका मोठा असतो. इतकेच नाही तर, लैंगिक छळाच्या कायद्यांतर्गत गंभीर कायदेशीर आरोपांच्या घटनाही अशा प्रसंगांत घडू शकतात. त्यामुळे फ्रँचायझींनी केवळ सतर्क राहून चालणार नाही, तर अशा जोखमी कमी करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे गरजेचे आहे. मैदानावर आणि हॉटेलमध्ये वावरताना खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मालकांना त्यांचे अधिकृत ॲक्रिडिटेशन कार्ड (Accreditation Card) सतत गळ्यात घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ड्रेसिंग रूममध्ये मालकांच्या हस्तक्षेपावर बंदी
संघाच्या शिस्तीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने संघ मालकांनाही कडक सूचना दिल्या आहेत. सामन्यादरम्यान संघमालक किंवा अधिकाऱ्यांना खेळाडूंशी बोलण्याची, डगआऊटमध्ये जाण्याची किंवा ड्रेसिंग रूममध्ये कोणतेही निर्देश देण्याची परवानगी नसेल. सुरक्षेच्या नावाखाली या नियमाचे उल्लंघन झाल्यास थेट शिस्तभंग मानला जाईल. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, स्पर्धेची विश्वासार्हता आणि खेळाडूंची सुरक्षा राखण्यासाठी शिस्तीचे हे जाळे पुन्हा एकदा मजबूत करणे आवश्यक झाले आहे.
बीसीसीआयची 'स्पेशल टास्क फोर्स' करणार हॉटेलची तपासणी
या कडक नियमांची अंमलबजावणी तपासण्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएल ऑपरेशन टीमची एक विशेष 'टास्क फोर्स' स्थापन करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स कधीही संघ थांबलेल्या हॉटेलची अचानक झडती घेऊ शकते. या झडतीदरम्यान जर एखादी अनाधिकृत व्यक्ती खेळाडूच्या रूममध्ये किंवा प्रतिबंधित क्षेत्रात आढळली, तर संबंधित खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा संघमालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच बोर्डाने भरला आहे. यामुळे आता मैदानाबाहेरील खेळाडूंच्या वागणुकीवर बीसीसीआयची करडी नजर राहणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Alert: सावधान! वादळी वाऱ्यासह वरुणराजा धडकणार; पुढील तीन दिवस 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा हाय-अलर्ट