Rahul Gandhi: नीट UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला असून, त्यांची मेहनत वाया गेली आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी; प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, गेल्या 2 वर्षांपासून 22 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत करत होते. मात्र, परीक्षा सुरू होण्याच्या 2 दिवस आधीच प्रश्नपत्रिका WhatsApp वर उपलब्ध होती, असा दावा त्यांनी केला. “संपूर्ण देशाला सत्य माहीत असतानाही शिक्षणमंत्री या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत आहेत, हे दुर्दैवी आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
विरोधी पक्षाच्या सूचनांना केराची टोपली
सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिले की, परीक्षा पॅनेलमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांना समाविष्ट करण्याची शिफारस सरकारने फेटाळून लावली. सरकारने या सूचनांकडे दुर्लक्ष करून भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या गाभ्यालाच हानी पोहोचवली आहे. ही केवळ चूक नसून भाजप आणि RSS यांच्यातील एका विशिष्ट ‘साखळी’चा हा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी केला.
80 वेळा पेपरफुटी आणि 2 कोटी तरुणांचे भविष्य टांगणीला
राहुल गांधी यांनी देशातील पेपरफुटीच्या घटनांचा पाढा वाचताना सांगितले की, आतापर्यंत विविध राज्यांत आणि केंद्रात 80 वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. यामुळे जवळपास 2 कोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. “पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि दोषींना तुरुंगात डांबण्याचे आदेश द्यावेत,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे। धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए। Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW. pic.twitter.com/6FRMMa8AI8 — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2026
पुनर्परीक्षा आणि भविष्यातील बदल
दमरम्यान, 3 मे रोजी झालेल्या NEET-UG 2026 परीक्षेला 22.5 लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, पेपरफुटीचे आरोप आणि सीबीआय तपासात राजस्थानमधील टोळीचा सहभाग उघड झाल्यानंतर ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) ही परीक्षा रद्द केली आहे. आता ही परीक्षा 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकावर आधारित (CBT) पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत.